रायपूर - बिलासपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. स्थलांतरीत मुजरांनी भरलेल्या बसची आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नांदघाट पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली आहे.
मजुरांनी भरलेली बस रजनांदगाव येथून झारखंडकडे जात होती अशी माहिती आहे. बसमध्ये 35 स्थलांतरीत मजूर होते. कोळशाने भरलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. टक्कर इतकी जोरदार होती की, 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केल्याचे गाव सरपंच हिरा भारती यांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.
कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनचा देशातील जनतेवर आणि त्यातही विशेषतः कामगार, मजूर आणि हातावर पोट असणाऱ्यांवर संकट कोसळले आहे. अनेकांनी आपल्या घराची वाट धरली आहे. यादरम्यान स्थलांतरीत कामगारांच्या अपघाताच्या बातम्या समोर येत आहेत.