लखनऊ - कोरोनाशी देशभरात सध्या एक युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारीही प्राणांची बाजी लावून मैदानात उतरले आहेत. मात्र या पोलिसांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील चार पोलिसांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
१४ एप्रिलला रामगड पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले होते. लॉकडाऊनचे नियम मोडल्यामुळे या तरुणावर ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, या पोलिसांच्या दुर्दैवाने हा तरुण कोरोना पॉझिटिव्ह निघाला, आणि त्याच्या माध्यमातून चार पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली. जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. के. दीक्षित यांनी याबाबत माहिती दिली.
ताब्यात घेतलेल्या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होताच, रामगडमधील २७ पोलिसांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. तसेच, या सर्व पोलिसांना तातडीने विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आज (बुधवार) त्यांच्या चाचण्यांचे अहवाल आज मिळाले. यामध्ये चार पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. गाझियाबादचे शहर उपाधीक्षक प्रबल प्रताप सिंह यांनी याबाबत माहिती दिली.
हेही वाचा : 'अजान'वरील बंदी मागे घ्या; बसपच्या खासदाराची मुख्य न्यायाधीशांकडे मागणी