कोलकाता - तृणमूल काँग्रेसचे माजी नेते राजीव बॅनर्जी, वैशाली डालमिया, प्रबीर घोषाल, रथिन चक्रवर्ती आणि रुद्रनिल घोष यांनी भाजपा प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या सभेत त्यांनी आज सहभाग घेतला. भाजपा नेते दिलीप घोष आणि कैलास विजयवर्गीय आणि काही दिवसांपूर्वी तृणमूलला रामराम ठोकत भाजपात सामील झालेले सुवेंदू अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पश्चिम बंगालमध्ये डबल इंजिनचे सरकार हवे आहे. केंद्रात आणि पश्चिम बंगाल या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सरकार हवे आहे, असे भाजपा नेते राजीब बॅनर्जी म्हणाले. यावेळी गृह मंत्री अमित शाह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधीते केले. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालला प्रत्येक क्षेत्रात मागे नेले आहे. त्यांनी राज्यातील लोकांवर अन्याय केला आहे. लोक त्यांना कधीही माफ करणार नाहीत. तृणमूल काँग्रेस व अन्य पक्षांचे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होत आहेत. निवडणुका झाल्या की पक्षात ममता दीदी एकट्याच राहतील, असे अमित शाह म्हणाले.
तृणमूल काँग्रेस आता पक्ष राहिली नसून एक खासगी कंपनी बनली आहे. फेब्रुवारीपर्यंत टीएमसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रिकामी होईल, तेथे कोणीही राहणार नाही, असे भाजप नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले.
राजीब बॅनर्जी यांनी यांनी 29 जानेवरील पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. गेल्या काही दिवसांपासूने ते पक्षावर नाराज होते. तृणमूलच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही.
टीएमसी नेते भाजपामध्ये सामिल -
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पश्चिम बंगालमधील कॅबिनेट मंत्री सुवेंदू अधिकारी यांनी सरकार आणि तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत, भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या पाठोपाठ टीएमसीचे अन्य कार्यकर्ते व नेते मोठ्या संख्येने भाजपामध्ये सामिल झाले होते. आता राजीव बॅनर्जी यांच्यासोबत अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
प. बंगालमध्ये राजकीय स्थिती काय?
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जोरात मोर्चबांधणी सुरू केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांनी बंगालमधील 42 पैकी 22 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. निकालात भाजपाने 18 जागा जिंकल्या होत्या. तर टीएमसीला 22 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. अशा परिस्थितीत 2021 च्या विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे 148 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. गेली निवडणूक 2016 मध्ये पार पडली होती. ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाने 211 जागांवरील विजयासह सपशेल बहुमत मिळवले व पश्चिम बंगालमधील आपली सत्ता राखली. तर काँग्रेसला 44 , डाव्या पक्षांना 26 आणि भाजपाला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.