महिसागर - गुजरात राज्यातील महिसागर जिल्ह्यातील खोडियार माता मंदिरात एक मगर अडकून पडली होती. या मगरीला पाहून येथे आलेल्या भाविकांनी तिची पुजा करण्यास सुरुवात केली. याची माहिती गुजरात वन विभागाला मिळाली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी मंदिर गाठून या मगरीची रविवारी सुटका केली.
महिसागरमधील या मंदिरात मगर वाट चुकल्याने आली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मंदिरात स्थानिक भाविकांनी मगरीला हळद, कुंकू, फुलं वाहून तिची पुजा करायला सुरुवात केली. याची माहिती काही स्थानिकांनी वनविभागाल कळवली.
दरम्यान भाविकांच्या पूजेमुळे मगरीची सुटका करण्यास विलंब लागल्याचे गुजरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या मगरीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. यावेळी मगरीला पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.