गुवाहाटी - आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय नॅशनल पार्क परिसर संपूर्ण पाण्याखाली आला आहे. जवळपास पार्कचे ८० टक्के नुकसान झाले आहे. उद्यानातील प्राण्यांचे हाल होत आहेत. प्राण्यांच्या निवाऱ्याच्या ठिकाणी पाणी साचल्यानं त्यांना जबरदस्तीने त्या ठिकाणाहून उंच ठिकाणी पाठवण्यात येत आहे. पावसामुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आला असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३७ वर अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळेही मृत्यूचे प्रमाण अधिक झाले आहे.
उद्यानातील प्राणी बाहेर पडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. पार्कमधील एका वाघाने जवळच्या परिसरातील एका ठिकाणी निवारा घेतला होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, वाघाला पकडून बंदिस्त केले असल्याचे वन्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
उद्यानामध्येच २२ किलोमीटरचा उंच हायलँड निर्माण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पूरस्थितीच्या काळात प्राणी त्याठिकाणी सुरक्षित राहू शकतील, हा यामागील उद्देश आहे. उद्यानासमोरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३७ परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच वाहनांची वेगमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे.
उद्यानामध्ये प्राण्यांची शिकार करू नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. दररोज परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. पूरस्थितीचा गैरफायदा घेऊन प्राण्यांची शिकार होऊ नये, हाच यामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.