मुर्शिदाबाद (पश्चिम बंगाल) - जिल्ह्यातील बेलडांगामध्ये बोट उलटल्याने पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दुर्गा मूर्ती विसर्जन दरम्यान, दुबणी घाटावर घडली. बोट उलटल्यानंतर स्थानिक नागरिकांनी बचाव कार्याला सुरूवात केली. आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेत मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
मिळालेल्या माहितीनुसार, बेलडांगामध्ये दुर्गा मूर्ती विसर्जनचा कार्यक्रम दुबणी घाटावर सुरू होता. तेव्हा दोन बोटींमध्ये अनेक जण दुर्गा मूर्तीसह स्वार होते. तेव्हा अचानक यातील एक बोट उलटली आणि त्या बोटीतील लोकं पाण्यात पडली. तेव्हा स्थानिकांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन तात्काळ मदत कार्याला सुरूवात केली. पण तो पर्यंत ५ जणांचा बुडून मृत्यू झाला. बचावकार्य सुरू असून मृत्यूचा आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही उलटली होती बोट
मागील आठवड्यात महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात देखील बोट उलटल्याची घटना घडली. तेराव्याच्या कार्यक्रमासाठी छत्तीसगड राज्यात गेलेले १५ जण बोट उलटल्याने इंद्रावती नदीत बुडाले होते. या दुर्घटनेतून १३ जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली येथील १० महिला व ५ पुरुष असे एकूण १५ जण तेराव्याच्या कार्यक्रमासाठी छत्तीसगड राज्यातील अटुकपल्ली येथे लाकडी बोटीने इंद्रावती नदी पार करुन गेले होते. ते सायंकाळच्या सुमारास परतत असताना इंद्रावती नदीत बोट दगडाला आपटुन पलटी झाली.