बंगळुरू : नवा कोरोना स्ट्रेन समोर आल्यानंतर खबरदारी म्हणून ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता या सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आल्या असून, कर्नाटकच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहाटे साडेचारच्या सुमारास ब्रिटनहून पहिले विमान उतरले.
चार कोरोना संशयित..
या विमानात एकूण २८९ प्रवासी होते. या सर्वांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. एकूण प्रवाशांमध्ये १४६ पुरुष, ९५ महिला, ३२ लहान मुले आणि १६ विमान कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या सर्वांची मोफत चाचणी करण्यात आली, यांपैकी चार जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या चौघांनाही स्वतंत्र कक्षांमध्ये आयसोलेट करण्यात आले असून, इतर प्रवाशांनाही चाचणीचा अहवाल येईपर्यंत विमानतळावरच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या.
निगेटिव्ह आलेल्यांनाही विलगीकरणात राहण्याच्या सूचना..
या सर्व प्रवाशांची चाचणी करण्यासाठी ३०हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच, १२ आरोग्य अधिकारीही याठिकाणी हजर होते. या सर्व प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी पाच पोलीस कर्मचाऱ्यांनाही याठिकाणी तैनात करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी कोविड निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांच्या हातावर शिक्के मारत, त्यांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहण्याच्या सूचना दिल्या.
हेही वाचा : ममता बॅनर्जींनी सर्वांना विनामूल्य कोविड-19 लस मिळण्याचे केले जाहीर