नवी दिल्ली - काही दिवासांपूर्वी चाऱ्यातून विषबाधा होऊन जवळपास 80 गायींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यातच आसाममध्ये गायींवर योग्य उपचार करण्यासाठी विशेष रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. गोपाष्टमीनिमित्त रविवारी आसामच्या दिब्रुगडमध्ये गायीच्या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले.
गोपाळ गोशाळा यांनी 17 लाख रुपये खर्च करून सुरभी आरोग्यशाळा हे रुग्णालय उभारले आहे. गोपाष्टमीच्या शुभमुहूर्तावर आम्ही गायींसाठी पहिल्या रुग्णालयाचे उद्घाटन केले आहे. रुग्णालय 30 किमीच्या परिघामध्ये सेवा देईल, असे गोपाळ गोशाळेचे व्यवस्थापक निर्मल बेदिया यांनी सांगितले. सध्या गोपाळ गोशाळेमध्ये 368 गायी आहेत.
राजस्थानात 80 गायींचा मृत्यू -
राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील एकाच गावातील 80 गायींचा रविवारी अचानक मृत्यू झाला आहे. अचानक 80 गायींचा मृत्यू झाल्याची बाब कळताच पशुसंवर्धन आणि वैद्यकीय विभागाची पथके घटना स्थळी दाखल झाले. गायींना चाऱ्यातून विषबाधा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पंचकुलामधील गोशाळेत 70 गायींचा मृत्यू -
ऑक्टोबर महिन्यात हरयाणाच्या पंचकुलामधील माता मनसा देवी गौशाळेत 70पेक्षा जास्त गायींचा मृत्यू झाला होता. चाऱ्यातून विषबाधा झाल्यामुळे गायींचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तथापि, गोहत्येचा प्रश्न हा नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. यावरून काही मॉबलिंचिंगच्या घटनाही घडल्या आहेत. गायींच्या सुरक्षेवरून अनेक जण राजकारण करताना पाहायला मिळतात.