गांधीनगर : गुजरातच्या अहमदाबादमध्ये आज तब्बल १५ दुकानांना आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नसली, तरी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शहराच्या बापूनगरमध्ये असलेल्या श्याम शिखर टॉवरमध्ये ही दुर्घटना घडली.
आग आटोक्यात, जीवितहानी नाही..
आगीची माहिती मिळताच अग्नीशामक दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर काही तासांमध्येच ही आग आटोक्यात आणण्यात आली. यासोबतच पोलिसांचे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. दिवसा या संकुलामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र रात्रीच्या वेळी आग लागल्यामुळे सुदैवाने याठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कोट्यवधींचे नुकसान..
एका दुकानाला लागलेली आग पुढे पसरत जाऊन १५ दुकाने जळून खाक झाली. आग लागलेल्या दुकानांमध्ये मोबाईल आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या दुकानांचाही समावेश होता. त्यामुळे, यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आगीचे कारण अस्पष्ट, होणार चौकशी..
ही आग कशी लागली याचा शोध घेण्यासाठी एफएसएल पथकाला पाचारण करण्यात आले आहे. यासोबतच, या संकुलामध्ये अग्निशामक व्यवस्था होती का, आणि असल्यास ती कितपत पुरेशी/अद्ययावत होती याबाबतचा तपासही अग्निशामक दलाचे एक पथक करणार आहे.
हेही वाचा : मुंबईच्या लालबाग गणेशगल्ली परिसरातील साराभाई इमारतीला आग; १६ रहिवासी जखमी