चेन्नई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कित्येक विस्थापित कामगार परराज्यांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांपैकी कित्येक कामगार घरी परतण्यासाठी नाना पद्धती वापरत आहेत. मात्र, तामिळनाडूमध्ये अडकलेल्या आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या मासेमारांनी कहरच केला आहे. चक्क प्लास्टिकच्या बोटीमधून हे ९८ मासेमार आपापल्या राज्यांमध्ये परतले आहेत. त्यांच्या या कामगिरीला धाडस म्हणावे, की वेडेपणा असा विचार आता तामिळनाडूमधील मासेमार करत आहेत.
दक्षिण भारतीय मच्छिमार वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष के. भारती यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, या मासेमारांना समुद्राच्या पाण्याचा, तेथील हवेचा अंदाज आहे. त्यांच्यासाठी समुद्र काही नवीन नाही, मात्र त्यांनी प्रवासासाठी निवडलेल्या बोटींमुळे आम्हाला सर्वांना चकित केले आहे. कारण एवढ्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बोटींचा वापर कोणीही करणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ओडिशा आणि आंध्र प्रदेशमधील सुमारे २५० मच्छिमारांचे कुटुंबीय तामिळनाडूमध्ये राहत आहेत. हे लोक आपापल्या मालकांना वारंवार सांगत होते, की त्यांनी आपल्याला परत पाठवण्याची व्यवस्था करावी. मात्र, मासेमारी विभाग आणि पोलीस याला परवानगी देत नव्हते. या लोकांना पैशाची काही चिंता नव्हती, कारण त्यांनी सुमारे दीड लाख रुपयांची एक याप्रमाणे नऊ बोटी विकत घेण्यासाठी त्यांनी पैसे जमवले होते. एरवीही ते मासेमारी बंदी असणाऱ्या काळामध्ये आपापल्या घरी जातात. मात्र, यावेळी लॉकडाऊनमुळे त्यांना बरेच दिवस इथेच रहावे लागले होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असेही भारती यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : अखेर गृहमंत्रालयाला जाग आली... लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसह विद्यार्थ्यांना स्वगृही जाता येणार