लखीमपूर खीरी - उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन फिरणाऱ्या एका हतबल बापास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास जिल्हा रुग्णालयाला अपयशी ठरले आहे. लाजीरवाणी बाब म्हणजे रुग्णालय प्रशासनाने यावर कोणतीही उपाययोजना केली नाही.
जिल्ह्यातील नीमगावचे राहिवासी असलेल्या तय्यब खान यांच्या ७ वर्षीय मुलगा सज्जादची तब्येत बिघडली होती. २५ जून रोजी त्याला जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांच्या वार्डात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान सज्जादचा मृत्यू झाला. सज्जादच्या मृत्यूनंतर रुग्णालयाने रुग्णवाहिका पुरवण्याच्या नावाखाली तय्यब खान यांना खूप वेळ वाट पाहायला लावली. रुग्णवाहिका मिळत नसल्यामुळे चिंताग्रस्त झालेले तय्यब खान मुलाचा मृतदेह हातात घेत रुग्णालयाच्या परिसरात फिरत होते. शेवटी थकून गेलेल्या तय्यब खान यांनी त्यांच्या नातेवाईकाला फोन करत मोटारसायकल मागवली. मोटारसायकलवर तय्यब खान आणि त्यांच्या नातेवाईकांनी मुलाचा मृतदेह नेला. परंतु, जिल्हा रुग्णालय प्रशासनाने हा सर्वप्रकार बघताना कोणतीही उपाययोजना केली नाही.
घटनेबद्दल बोलताना मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज अग्रवाल म्हणाले, या घटनेबाबत आम्ही रुग्णालय प्रशासनासोबत चर्चा केली आहे. तय्यब खान यांना रुग्णवाहिकेसाठी वाट बघण्यास सांगितले होते. परंतु, तय्यब यांनी याला नकार दिला. यानंतर, ते स्वत: मुलाचा मृतदेह घेऊन गेले.