श्रीनगर - नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा सक्तवसुली संचालनालयासमोर(ईडी) हजर झाले. जम्मू काश्मीर क्रिकेट असोशिएशनमध्ये(जेकेसीए) कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून २०१८ पासून त्यांची चौकशी सुरू आहे. ८३ वर्षीय अब्दुल्ला यांची याआधी १९ ऑक्टोबरला(सोमवार) ईडीने सहा तास चौकशी केली होती.
सोमवारी त्यांची चौकशी केल्यानंतर मी चिंतेत नसून तपासात सहकार्य करत असल्याचे अब्दुल्ला म्हणाले होते. काश्मीरची स्वायत्तता पुन्हा मिळविण्यासाठी काश्मीरातील सर्व पक्षांनी मिळून गुपकर घोषणापत्र पुढे नेण्याचा निर्धार केला नुकताच केला आहे. त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी ईडीने त्यांची चौकशी केली. मनी लॉड्रींग कायद्यानुसार अब्दुल्ला यांचा जबाब नोंदविला जाईल, असे ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले. अब्दुल्ला यांची मागील वर्षी चंदीगडमध्ये पहिल्यांदा ईडीने चौकशी केली होती. जेकेसीएचे अध्यक्ष असताना अब्दुल्ला आणि घेतलेले निर्णय आणि कथित गैरव्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.
अब्दुल्ला यांच्या विरोधात सर्वात प्रथम केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीने या आरोपांची दखल घेत गुन्हा दाखल केला. सीबीआयने जेकेसीएच्या माजी अधिकाऱ्यांना आरोपी बनविले आहे. यामध्ये महासचिव मोहम्मद सलीम खान आणि माजी खजिनदार अहसान अहमद मिर्जा यांचा समावेश आहे. सीबीआयने २०१८ साली सुमारे ४३ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २००२ ते २०११ या काळात काश्मीर क्रिकेटचा विकास करण्यासाठी ही रक्कम दिली होती. मात्र, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.