अंबिकापूर : छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये असलेला हा दर्गा 'तकिया शरीफ' म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे, बाबा मोहब्बत शाह यांच्या समाधीसोबत त्यांच्या पोपटाची कबरदेखील आहे.
शाह बाबाच्या दर्ग्यावर येणाऱ्या प्रत्येकाचा नवस पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. भाविकांची बाबांच्या समाधीसह त्यांच्या पोपटाच्या समाधीवरही तितकीच आस्था आहे. त्यामुळेच येथे येणारे भाविक बाबाच्या दर्ग्यासह त्यांच्या पोपटाच्या समाधीवरही चादर चढवतात.
ही छत्तीसगडमधील सर्वात जुनी मजार आहे. या ठिकाणी सर्वधर्माचे लोकं येऊन आपले मागणे मागतात, मागणे पूर्ण झाल्यानंतर नवस फेडायला येतात. दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात उरुसचे आयोजन केले जाते. ज्यात सर्व धर्माचे लोकं मोठ्या संख्येने सहभाग घेतात. त्यामुळे, येथे विविधतेत एकतेचे दर्शनही आपल्याला होईल.
या ठिकाणी असलेल्या समाधीवर सन १९५१मध्ये इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. त्यासाठी पाया खोदण्याचे काम सुरू असताना जमिनीतून राख निघायला लागली. ती राख काढण्यासाठी आणखी काही फूट खोल खोदण्यात आले. मात्र, राख निघण्याचे प्रमाण कमी होत नव्हते. त्यामुळे, त्या राखेच्या ढिगाऱ्यावरच इमारतीचे बांधकाम करण्यात आले. आश्चर्य म्हणजे, राखेच्या ढिगाऱ्यावर उभी असलेली ही इमारत इतक्या वर्षानंतरही अगदी मजबूत स्थितीत आहे. खोदकामादरम्यान जमिनीतून मिळालेल्या काही अवशेषांवरून ही समाधी सूफी पंथातील मदारी संप्रदायाशी निगडीत असल्याचे कळते.
या समाधीला लागूनच एक मंदिरदेखील आहे. ज्याला स्थानिक लोक येथील नक्कट्टी देवीचे मंदिर असे म्हणतात. हे मंदिर तेथील कोरवा समाजाचे पहिले आणि एकमात्र मंदिर असल्याचे या दर्गाच्या इतिहासाचा अभ्यास करणारे अब्दुल रशीद सिद्दीकी सांगतात. हिंदू-मुस्लीम दोन्ही धर्माच्या भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.
तकिया शरीफ दर्ग्यावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा नवस पूर्ण होतो. मुराद शाह वलीच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे, येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. सरगुजा भागात असलेल्या या दर्ग्यावर बिहार, झारखंडसह इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.