गांधीनगर - प्रसिद्ध ज्योतिषी बिजेन दारूवाला यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनासंबंधी लक्षणे आढळल्यामुळे त्यांना अहमदाबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना दम्याचा त्रास असल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दारूवाला हे जगप्रसिद्ध ज्योतिषी आहेत. त्यांचा 'गणेशा स्पीक्स' हा ज्योतिष्यविषयक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. ते ९० वर्षांचे आहेत. दम्याचा त्रास असूनही त्यांना सिगारेटचे व्यसन होते. त्यामुळे त्यांची फुफ्फुसे कमकुवत झाली आहेत. आज न्यूमोनियाचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये कोरोनासंबंधी लक्षणे आढळून आल्याने त्यांना तातडीने आयसीयूमध्ये नेत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.