नवी दिल्ली - सोशल मीडिया जायंट फेसबुक कंपनी भारतातील सत्ताधारी भाजप धार्जिणे धोरण स्वीकारत असल्यावरून मागील काही दिवसांपासून आरोप सुरू आहेत. विदेशातील वॉलस्ट्रिट जर्नल आणि टाईम्स मग्झिनमध्येही या संबंधीचे वृत्त आले होते. त्यानंतर भारतात काँग्रेससह विरोधी पक्षांनी भाजपला धारेवर धरले आहे. दरम्यान, भारतातील फेसबुकचे प्रमुख अजित मोहन आज(बुधवार) संसदीय समितीसमोर चौकशीसाठी हजर झाले होते.
माहिती तंत्रज्ञानावरील संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष काँग्रेस नेते शशी थरुर आहेत. फेसबुकने पक्षपातीपणांच्या आरोपांवर आपली बाजू मांडण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश त्यांनी भारतातील कंपनीच्या प्रमुखाला दिले होते. कंपनी नागरिकांचे हक्क कशा प्रकारे सुरक्षित ठेवते, यावर समितीने उत्तर मागितले होते. त्यानुसार अजित मोहन आज दुपारी समितीपुढे हजर झाले होते.
द्वेष आणि तिरस्कार पसरवणारे भाषण करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर फेसबुकने नियमानुसार कारवाई केली नाही, असा अहवाल 'द वॉल स्ट्रिट जर्नल' ने नुकतास प्रसिद्ध केला होता. त्यावर कंपनीचे काय मत आहे? हे जाणून घेण्यासाठी भारतातील प्रमुखांना समितीपुढे बोलावण्यात येईल, असे शशी थरूर यांनी जाहीर केले होते. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी शशी थरुर यांच्या निर्णयावर टीका करत संसदीय समितीचा थरुर गैरवापर करत असल्याची टीका केली आहे. थरुर यांना या समितीवरून काढून टाकावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
फेसबुक आणि व्हॉट्स अॅपचा भारतीय लोकशाही आणि सामाजिक एकोप्यावरील हल्ला करण्याचे प्रकार आंतरराष्ट्रीय माध्यमांनी उघडा पाडला आहे, असे सोमवारी राहुल गांधी यांनी वक्तव्य केले होते. देशाच्या अंतर्गत विषयांत कोणतीही कंपनी हस्तक्षेप करु शकत नाही. जर कोणी तसे करत असेल तर, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. तसेच दोषींना शिक्षा द्यायला हवी, असे गांधी म्हणाले होते.
माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी मंगळवारी फेसबुक कंपनीचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना पत्र लिहले आहे. फेसबुकचे कर्मचारी भारतात आधीची निवडणूक हरलेल्यांना पाठिंबा देत आहेत. तसेच पंतप्रधान मोदी आणि वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्यांची बदनामी करत आहेत, असे प्रसाद यांनी पत्रात लिहले होते.