नवी दिल्ली - तब्बल ७ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना आज (शुक्रवार) सकाळी फाशी देण्यात आली. यावर निर्भयाच्या आईने आनंद व्यक्त केला आहे. 'उशिरा का होईना दोषींना फाशी झाली आणि अखेर निर्भयाला न्याय मिळाला, याचा मला आनंद आहे', असे त्या म्हणाल्या.
'माझ्या मुलीवर आत्याचार झाला. मात्र, दोषींचे वकील ए.पी. सिंह सत्य बदलण्याचा प्रयत्न करत होते. ज्या प्रकारे त्यांनी कायद्याचा दुरुपयोग केला, ते अत्यंत चुकीचे होते. मात्र, अखेर सत्याचा विजय झाला. लोक कायद्याचा दुरुपयोग करत असल्याने मुलींना न्यायासाठी लढावे लागत आहे, यावर विचार करायला हवा. व्यवस्था बदलणे गरजचे आहे', अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली आहे.
निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात आली. त्यामुळे पीडितेसह कुटुंबीयांना सात वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. दिल्लीमध्ये 16 डिसेंबर 2012 ला घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता. तेव्हापासून दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी निर्भयाचे कुटुंबीय आणि संपूर्ण देश वाट पाहत होता. दोषींना फाशी जाहीर झाल्यानंतरही तीनवेळा फाशी टळली होती. त्यामुळे निर्भयाच्या आईचा धीर खचत होता. मात्र, शेवटी २० मार्च २०२० ला डेथ वॉरंट काढण्यात आले. दोषींकडून फाशी टाळण्यासाठी प्रयत्न करण्यातही आले. मात्र, या डेथ वॉरंटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.