जगभरात थैमान घातलेला कोरोना आता हळूहळू भारतातही पसरत आहे. देशात सध्या याचा प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे. तो तिसऱ्या टप्प्याकडे जाऊ नये यासाठी सरकार अनेक निर्णय घेत आहे. जनतेनेही या आणीबाणीच्या काळात खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
तर दुसरीकडे, चीनमधील कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत चालला आहे. चीनने या विषाणूशी कसा लढा दिला, भारताने आणि भारतीयांनी त्यातून काय शिकायला हवे, तसेच चीनमध्ये आता कशी परिस्थिती आहे? या सर्व गोष्टींबद्दल चीनमधील अनिवासी भारतीय संघटनेच्या शांघाय शाखेचे माजी अध्यक्ष, अमित वाईकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी चर्चा केली. पाहूया त्यांच्या या विशेष मुलाखतीचा तिसरा भाग..
प्रश्न - चीनमध्ये याचा उगम झाला असूनही, भारतात मात्र हा विषाणू मध्य-पूर्व आशिया किंवा युरोप मार्गे आला. तुम्हाला असे वाटते का, की भारताने चीनवर एवढे लक्ष दिले, की त्यांनी इतर देशांमधून येणाऱ्या नागरिकांकडे दुर्लक्ष केले.
अमित - या विषाणूचा उगम चीनमधूनच झाला आहे. कोरोनाचा उगम झाला तेव्हा चीनी नववर्ष सुरू होते, जेव्हा लोक सुट्ट्यांसाठी बाहेरच्या देशांमध्ये फिरायला जातात. साधारणपणे दहा वर्षे चीनमध्ये राहिल्यामुळे आम्हाला माहिती आहे, की चीनी लोक सहसा पर्यटनासाठी युरोप, मध्य-पूर्व आशिया आणि आफ्रिका अशा ठिकाणी जातात. तसेच युरोप आणि मध्य-पूर्व आशियामधील बरेचसे व्यापारी, जे चीनमध्ये राहत होते, तेदेखील या सुट्ट्यांच्या निमित्ताने मायदेशी परत जात होते. त्यामुळे भारतात हा विषाणू कोणत्या मार्गे आला हा मुद्दा गौण आहे.
शिवाय भारताने पर्यटन व्हिसावर किंवा अगदी पर्यटकांवरच बंदी आणण्यापेक्षा, आधी जे पर्यटक भारतात येत होते, त्यांची तपासणी मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक होते. भारतात सध्या ज्याप्रकारे परदेशातून आलेल्या सर्वच नागरिकांची किंवा पर्यटकांची तपासणी केली जाते, त्याप्रकारची तपासणी प्रक्रिया आधीच सुरू करणे आवश्यक होते. मात्र, सुरुवातीला नक्कीच केवळ चीनमधून आलेल्या नागरिकांचीच तपासणी करण्यात येत होती.
उदाहरण म्हणजे, एअर इंडियाने जेव्हा चीनमधील विमानसेवा बंद केली, तेव्हा इथले भारतीय खूपच घाबरले. मात्र, लवकरच त्यांना समजले, की थायलंडने आपली विमानसेवा बंद केली नाही. त्यामुळे इथून बँकॉक किंवा क्वालालांपूरला जाऊन तेथून मुंबईला जाणे शक्य होते. तेव्हा त्या मार्गाने गेलेल्या आमच्या काही मित्रांनी आम्हाला सांगितले, की मुंबईमध्ये विमानतळांवर ज्या प्रमाणात तपासणी होणे गरजेचे होते, त्या प्रमाणात चौकशी होत नव्हती. त्या मित्रांनी आम्हाला याबाबत सांगितले, त्यानुसार आम्ही महाराष्ट्र शासनाशी संपर्क केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये मुंबई विमानतळावर विशेष तपासणी सुरू झाली. मात्र, भारतात बाकी विमानतळांवर त्याप्रमाणात जागरुकता नव्हती. आता मात्र आपल्याकडे चांगल्या प्रकारे तपासणी होत आहे.
प्रश्न - कोरोनाचा चीनी आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झाला आहे? भारतातही कोरोनामुळे शेअर बाजार कोसळताना दिसून येत आहे. काय सांगाल?
अमित - याच्या आधीही जेव्हा सार्स आला होता किंवा अशाच जागतिक महामाऱ्या आल्या होत्या, तेव्हाही शेअर बाजारावर असाच परिणाम झाला होता. केवळ भारतातच नाही, तर जगभरात असाच परिणाम दिसून आला होता. मात्र, ते तेवढ्याच वेगाने पूर्ववतही झाले होते. आताही चीनमधील परिस्थिती जसजशी सुधारत आहे, तसतसा इथला शेअर बाजारही वधारत आहे.
चीनमधील व्यापाराबद्दल बोलायचे झाल्यास, गेले दोन महिने चीन सरकारचे लक्ष्य केवळ कोरोनाशी लढा देण्यावर केंद्रीत होते. त्यासाठी त्यांनी व्यापार थांबवला, कार्यालये-कारखाने बंद केले. आता जसाजसा कोरोना आटोक्यात येत आहे, तसतसे ते बाकी गोष्टींवर लक्ष देत आहेत. चीन सरकारने सध्या सर्व महामार्गांवरील टोल बंद केले आहेत. त्यांनी छोट्या कंपन्यांना बँकांमार्फत मदत देण्यास सुरुवात केली आहे. तसेच वेगवेळ्या कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांचा 'पीएफ' सरकार परत देत आहे. जेणेकरून समजा कोणाकडे रोख रक्कम नसेल, तर त्याला तो फंड वापरता येईल. यासोबतच, जे कोणी छोटे दुकानदार आहेत, ज्यांचे गेल्या दोन महिन्यात बरेच नुकसान झाले आहे, त्यांच्या दुकानांचे पुढील दोन महिन्यांचे भाडे हे सरकार देणार आहे. यामुळे दोन महिन्यात त्या दुकानदारांना जो काही तोटा झाला आहे, तो भरून निघेल. या सर्व उपायांमुळे चीन सरकारला यावर्षी नक्कीच काही प्रमाणात आर्थिक नुकसान होईल. मात्र, ते नुकसान भरून काढण्याचा पूर्ण प्रयत्न हा देश करेल.
यासंदर्भातच एक उदाहरण म्हणजे, बीवायडी कार कंपनी. बीवायडी, म्हणजेच बिल्ड युअर ड्रीम्स ही चीनमधील एक कार कंपनी आहे. ज्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव चीनमध्ये सर्वाधिक होता, तेव्हा या कंपनीने आपला सर्वात मोठा कारखाना बंद करत, त्याठिकाणी अवघ्या दहा दिवसांमध्ये जगातील सर्वात मोठा मास्क आणि हातमोजे बनवणारा कारखाना त्यांनी सुरू केला. आज त्याठिकाणी दिवसाला आठ लाख फेस मास्क बनवले जातात. यातून भारतातील काही कंपन्यांनी नक्कीच प्रेरणा घेणे आवश्यक आहे.
प्रश्न - कोरोनामुळे भारताला व्यापारासंबंधी काही छुप्या संधी उपलब्ध होतील का?
अमित - नक्कीच. आम्ही ज्या कंपनीमध्ये काम करतो, तिथे एक गोष्ट सर्वांना माहिती झाली आहे, की दर चार-पाच वर्षांनी चीनमध्ये अशा प्रकारची स्थिती निर्माण होतेच, ज्यामुळे सर्व व्यापार विस्कळीत होतो. त्यामुळे आमची कंपनीही चीनसह अन्य देशांचे पर्याय शोधत आहोत. भारत हा नेहमीच सर्व मोठ्या कंपन्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. मात्र प्रश्न हा नाही, की त्या कंपन्या भारतात येतील का? प्रश्न हा आहे, की आपण त्यासाठी तयार आहोत का?
केवळ चीनी नव्हे, तर इतर देशांमधील कंपन्याही भारतात याव्यात यासाठी आपले शासन, आपल्याकडील वातावरण, आपले लोक तयार आहेत का? याचे उत्तर नक्कीच कठीण आहे. मात्र, याचे उत्तर लवकरात लवकर मिळाले, तर नक्कीच ही भारतासाठी मोठी संधी होऊ शकते.
अमितजींशी आपण चीनमधील त्यांच्या अनुभवासंबंधी आणखीही चर्चा केली आहे. पुढील भागामध्ये आपण चीनच्या एकंदर आरोग्यव्यवस्थेबाबत, आणि चीनने आश्चर्यकारकरित्या केवळ १५ दिवसांमध्ये उभारलेल्या भव्य रुग्णालयाबाबत बोलणार आहोत. हा भाग पाहण्यासाठी क्लिक करा : VIDEO : चीनने अवघ्या १५ दिवसांत उभारलेल्या रुग्णालयाची रंजक कथा; पहा विशेष मुलाखत - भाग ४
या मुलाखतीचा पहिला भाग पहा : EXCLUSIVE : 'कोरोना' उद्रेक, अन् चीनमधील अनुभव.. पाहा विशेष मुलाखत!