जगभरात थैमान घातलेला कोरोना आता हळूहळू भारतातही पसरत आहे. देशात सध्या याचा प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे. तो तिसऱ्या टप्प्याकडे जाऊ नये यासाठी सरकार अनेक निर्णय घेत आहे. जनतेनेही या आणीबाणीच्या काळात खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
तर दुसरीकडे, चीनमधील कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत चालला आहे. चीनने या विषाणूशी कसा लढा दिला, भारताने आणि भारतीयांनी त्यातून काय शिकायला हवे, तसेच चीनमध्ये आता कशी परिस्थिती आहे? या सर्व गोष्टींबद्दल चीनमधील अनिवासी भारतीय संघटनेच्या शांघाय शाखेचे माजी अध्यक्ष, अमित वाईकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी चर्चा केली. पाहूयात त्यांच्या या विशेष मुलाखतीतील काही ठळक मुद्दे...
प्रश्न - कोरोना विषाणूचे उगमस्थान झालेले वुहान, आणि तुम्ही राहत असलेल्या शांघाय शहरात सध्या काय परिस्थिती आहे? तसेच, पूर्ण चीनमध्ये सध्या काय परिस्थिती आहे?
अमित : जिथे हा कोरोना विषाणू पहिल्यांदा आढळून आला, त्या वुहानपासून शांघाय सुमारे ८०० किलोमीटर दूर आहे. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आनंद होईल, की शांघायमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जवळपास नाहीसा झाला आहे. तसेच, वुहानमध्येही नव्या रुग्णांची संख्या ही बोटांवर मोजण्याएवढी झाली आहे. केवळ चीनसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी ही एक चांगली बातमी आहे.
प्रश्न - चीनने विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी कोणते उपाय केले? तसेच, भारतासारख्या देशांनी, जिथे नुकताच या विषाणूने प्रवेश केला आहे, त्यांनी काय खबरदारी घ्यावी?
अमित : कोरोनाचा उद्रेक झाला, तेव्हा चीनमध्ये नववर्ष सुरू होणार होते. चीनमध्ये नववर्षोत्सव हा आपल्याकडील दिवाळीप्रमाणे असतो. या काळात चीनमधील जवळपास अर्धे नागरिक, म्हणजेच सुमारे ३०० ते ५०० दशलक्ष लोक देशभरात आणि देशाबाहेरही प्रवास करतात. त्यामुळे, हा उद्रेक झाला, तेव्हा तेवढ्या प्रमाणात लोक प्रवास करत होते. त्यामुळेच लोकांना प्रवास करण्यापासून रोखण्यासाठी, वुहान शहर बंद करणे हाच एक उपाय शिल्लक होता.
चीनने जेव्हा या परिस्थितीला राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित केले, तेव्हा येथील सरकारचे लक्ष्य ठरलेले होते - ते म्हणजे कोरोनाशी लढा देणे. त्यामुळे एका रात्रीत त्यांनी निर्णय घेत पूर्ण शहरातील शाळा, रस्ते, व्यापार सर्व गोष्टी बंद केल्या. तेव्हा कंपन्यांचे अर्थकारण, विद्यार्थ्यांच्या परीक्षा या सर्व गोष्टींचा विचार करण्यात त्यांनी वेळ दडवला नाही. लोकांनी रस्त्यांचा वापर करु नये, म्हणून त्यांनी चक्क रस्ते खणून ठेवले. त्यावेळी साधारणपणे ३०० ते ५०० भारतीय वुहानमध्ये होते. त्यांनाही सांगण्यात आले होते, की तुम्ही वुहान सोडू नका, किंवा तसा प्रयत्नही करू नका चीनमध्ये असणाऱ्या भारतीय दूतावासाने यावेळी खरेच खूप चांगले काम केले. येथे अडकलेल्या सर्व भारतीयांना वेळेवर आणि आवश्यक ती सर्व माहिती दूतावासाकडून पुरवली जात होती. आवश्यक त्या सर्व सोई त्यांना पुरवण्यात येत होत्या.
भारतीयांना यावेळी आम्ही हे सांगू, की सरकार तुम्हाला जे सांगत आहे, ते तुम्ही नक्की पाळा. तुम्हाला घरातून बाहेर न पडण्याचे आदेश दिले गेले असतील, तर तुम्ही घराबाहेर पडणे टाळाच. शिवाय आपल्या मित्रांना भेटणेही टाळा. आम्हीही गेले दोन महिने आमच्या मित्रांना भेटलो नाही. तसेच, हात धुण्याकडे, तब्येत सांभाळण्यावर लक्ष द्या. सर्दी-खोकल्यासारखा छोटासा आजारही असेल तरी तुम्ही कोरोनाची चाचणी करुन घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, घाबरू नका. तुम्ही योग्य ती खबरदारी घेतली, तर तुमचाच नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांचाही जीव वाचू शकतो.
अमितजींशी आपण चीनमधील त्यांच्या अनुभवासंबंधी आणखीही चर्चा केली आहे. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला, तेव्हा तेथील भारतीय कोणत्या परिस्थितीमध्ये होते, त्यांनी कोणत्या गोष्टींचा सामना केला. तसेच, चीनने कोरोनाशी लढा देताना तंत्रज्ञानाची कशी मदत घेतली याबाबत ते पुढील भागात सांगणार आहेत.