श्रीनगर - अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी २ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी हफीज सज्जाद बट्ट याचा समावेश आहे. १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यासाठी बट्ट याच्या कारचा वापर करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवानांना वीरमरण आले होते.
जम्मू-कश्मीरमध्ये अनंतनागमध्ये झालेल्या या चकमकीत लष्कराच्या एका मेजरलाही वीरमरण आले. तर, तिघे जखमी झाले होते. अद्याप ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह हाती आलेले नाहीत.
राष्ट्रीय रायफल्स आणि विशेष मोहीम पथकाद्वारे ही संयुक्त कारवाई करण्यात आली. दहशतवाद्यांची गुप्त माहिती मिळाल्यानंतर घेराव आणि शोध मोहीम सुरू झाली.
मंगळवारी सलग दुसऱ्यांदा या भागात सैन्य आणि दहशतवाद्यांदरम्यान चकमक सुरू झाली आहे. येथे २-३ दहशतवादी लपलेले असल्याची माहीती मिळाली आहे. त्यांचा शोध सुरू आहे.