बंगळुरू (कर्नाटक) - एक्स बॉयफ्रेंडने आपल्या एक्स गर्लफ्रेंडला खासगी व्हिडिओ आणि फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल सव्वाकोटी रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या पतीने व्हाईटफिल्ड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीकडून तिच्या एक्स बॉयफ्रेंडने आणि त्याच्या मैत्रिणीने 1.25 कोटी रुपये उकळले. दरम्यान, याप्रकरणी आरोपीविरोधात व्हाईटफिल्ड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काय आहे प्रकार?
पीडिता महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना महेश नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. मात्र, नंतर तिचा विवाह बंगळुरू येथील व्यावसायिकाशी झाला आहे. या जोडप्याचे व्हाईटफिल्ड येथे स्वत:चे सुपरमार्केट आहे. या जोडप्याला 8 वर्षाचे बाळही आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये आरोपी महेशने तिला एक मेसेज पाठवला. दोघांनी एकमेकांशी गप्पा ही मारल्या. तसेच दोघांनी एकमेकांची भेटही घेतली. यानंतर अनुश्री नावाच्या एका तरुणीने पीडितेशी मैत्री केली. अनुश्रीने नंतर पीडितेला सांगितले की, ती महेशची गर्लफ्रेंड आहे. यानंतर तिघेही वारंवार संपर्कात होते. तसेच एकमेकांशी गप्पा मारायचे.
हेही वाचा - ...म्हणून अल्पवयीन मुलीने तिच्या पालकांविरोधातच दाखल केली तक्रार
तब्बल सव्वा कोटी रुपये उकळले -
मात्र, नंतर अनुश्रीने पीडितेला सांगितले की, माझ्याजवळ तुझे आणि तुझा पूर्व प्रियकर महेशचे काही खासगी फोटो आणि व्हिडिओ आहेत. तसेच याबदल्यात पैशाची मागणी केली. अन्यथा हे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले जातील, अशी धमकीही दिली. यानुसार तिने पीडितेकडून मागील दीड वर्षांपासून जवळपास 1.25 कोटी रुपये उकळले. पीडितेच्या पतीने बँकेतून पैसे ट्रान्सफर केल्याप्रकरणी पीडितेला अनेक प्रश्न विचारले. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पीडिता आणि तिच्या पताने व्हाईटफिल्ड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.