नवी दिल्ली - आपल्या 'बाहुबली' पंतप्रधानांनाही कोरोनाशी सामना करता आला नाही, आणि त्यामुळे देश आणखीनच अडचणीत पोहोचला आहे अशी टीका काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल भाजपने आपलीच पाठ थोपटून घेतली होती. त्यानंतर सिब्बल यांनी सरकारवर हा बाण सोडला आहे.
सिब्बल यांनी आरोप केला आहे, की सरकारने एनपीआर, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि असंविधानिक कृती (प्रतिबंध) कायद्याचा गृहमंत्रालयाने गैरवापर केला आहे. विशेषतः असंविधानिक कृती (प्रतिबंध) कायदा हा केवळ दहशतवादी कृत्यांविरोधी वापरण्यात येणार असल्याची तरतूद असली तरी सरकार मात्र याचा सर्रास कुठेही वापर करताना दिसून येत आहे, असे ते म्हणाले.
शेकडो किलोमीटर चालत आपल्या राज्यांमध्ये परत जाणारे कामगार, हे सरकारच्या औदासीनतेची साक्ष आहेत. कित्येक लोकांना उपासमारीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. स्थलांतरित मजूरांसमोरचे हे संकट मोदी सरकारला हाताळता आले नाही, असेही सिब्बल म्हणाले.
सध्या चीनशी आपले सीमेवरील संबंध चांगले नाहीत. त्यातच नेपाळही आपल्याकडे डोळे वटारून पाहत आहे. पंतप्रधान मोदी नेपाळला का प्रत्युत्तर देत नाहीत? असा प्रश्नही सिब्बल यांनी उपस्थित केला. याबाबत सत्य परिस्थिती काय आहे हे पंतप्रधानांनी जनतेसमोर स्पष्ट करावे अशी मागणीही त्यांनी केली. यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधींनीही अशीच मागणी केली होती.
हेही वाचा : 'कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका गरीब अन् मजुरांना बसला'