राज्यात मंगळवारी दिवसभरात ११ हजार ११९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे... निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे... यंदा यूएईत होणाऱ्या आयपीएलला नवा प्रायोजक मिळाला आहे., ड्रीम ११ आता आयपीएलची मुख्य प्रायोजक कंपनी असणार आहे... कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीचे भीषण चित्र समोर आले आहे... सुशांतसिंह राजपूत प्रकरणी ईडी व मुंबई पोलिसांकडून तपास केला जात असताना सुशांतसिंहची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिने या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे...
- मुंबई - राज्यात मंगळवारी दिवसभरात ११ हजार ११९ नवीन रुग्णांची नोंद झाले असून, ९ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ५६ हजार ६०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ४२२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा - राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक 422 कोरोना रुग्णांचा मृत्यू; 11 हजार 119 नवे रुग्ण
- नागपूर - शहरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओम नगर परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धीरज राणे आणि सुषमा राणे असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. या शिवाय त्यांची दोन मूले देखील मृतावस्थेत आढळून आली आहेत. कोराडी पोलीस घटनास्थळी पोहचले असून आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.
सविस्तर वाचा - सामूहिक आत्महत्येने नागपूर हादरले.. दोन चिमुकल्यांसह पती-पत्नीने संपवले जीवन
- सातारा - लग्नाच्या रात्रीच नववधूने सव्वा लाख रूपयांची रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे दोन लाखांच्या ऐवज घेऊन पोबारा केला. भुरकवडी (ता.खटाव) येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत विशाल दिनकर जाधव (रा. भुरकवडी,ता.खटाव) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सविस्तर वाचा - लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूने केले असे काही.. वाचून तुम्हालाही बसेल धक्का
- मुंबई/पुणे - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशात गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून गणेशोत्सवावरही कोरोनाचं सावट आहे. यामुळे यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. सोबतच गणरायाच्या आगमणापासून विसर्जनापर्यंतची नियमावली देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, मायानगरी मुंबई आणि गणेशोत्सवाला सुरूवात झाली त्या पुण्यात या निर्बंधांमुळे गणेश मंडळांच्या उत्साहावर विरजन पडले. सुरूवातीला तर मागील अनेक वर्षांची परपंदा यंदा खंडित होते की काय अशी भिती या मंडळांना होती. मात्र, राज्यशासनाने आखून दिलेली नियमावली फार आनंददायक नसली तरी समाधानकारक नक्कीच आहे. आता याच नियमांच्या अधीनराहून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय गणेश मंडळांनी घेतला आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यातील मानाच्या गणेशमंडळांनी कशापद्धतीने तयारी केली आहे, यासंदर्भातील ईटीव्ही भारताचा विशेष रिपोर्ट.
सविस्तर वाचा - कोरोनाच्या सावटाखाली मुंबई-पुण्यात 'अशा' पद्धतीने साजरा होणार गणेशोत्सव
- सातारा - मागील ५ दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे १०४ टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणात आतापर्यंत ९२.८१ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. धरणात प्रतिसेकंद 1 लाख 14 हजार 980 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. यामुळे जलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 10 फुटावर उचलण्यात आलेले धरणाचे सहा वक्राकार दरवाजे अजूनही उघडे ठेवण्यात आले आहेत. पुढील २४ तासात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास दरवाजे आणखी उचलून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल, अशी माहिती माहिती कोयना जलसिंचन विभागाकडून देण्यात आली.
सविस्तर वाचा - राज्यातील धरणे भरली; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- नवी दिल्ली : निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एक महिन्यापूर्वी त्यांची एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (एडीबी) उपाध्यक्ष पदी निवड झाली होती. त्यानंतर, आज (मंगळवार) त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यांनी आपल्याला ३१ ऑगस्टला पदमुक्त करावे, अशी मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सविस्तर वाचा - निवडणूक आयुक्त अशोक लवासांचा राजीनामा
- मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी ईडी व मुंबई पोलिसांकडून तपास केला जात असताना सुशांतसिंहची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिने या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. मी आदित्य ठाकरे यांना कधीही भेटले नसल्याचे तिने म्हटले आहे. याबरोबरच आदित्य ठाकरे यांचा या गोष्टीशी कुठलाही संबंध नसल्याचेही रिया चक्रवर्ती हिचे वकिल सतीश माने-शिंदे यांनी त्यांच्या सोशल अकाउंटवर पोस्ट करत म्हटले आहे.
सविस्तर वाचा - रिया चक्रवर्तीचे आदित्य ठाकरें बाबत मोठे वक्तव्य, म्हणाली...
- नवी दिल्ली - यंदा यूएईत होणाऱ्या आयपीएलला नवा प्रायोजक मिळाला आहे. ड्रीम ११ आता आयपीएलची मुख्य प्रायोजक कंपनी असणार आहे. प्रायोजकत्वासाठी ड्रीम ११ ने २२२ कोटी रूपये मोजले असल्याचे वृत्त आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिले. मुख्य प्रायोजकाच्या शर्यतीत अनअॅकॅडमी, टाटा आणि बायजूस हे देखील होते. अनअॅकॅडमीने २१० कोटी, टाटाने १८० कोटी आणि बायजूसने १२५ कोटींची बोली लावली.
सविस्तर वाचा - यंदाच्या आयपीएलला मिळाला नवा प्रायोजक, २२२ कोटींची बोली लावून 'या' कंपनीची बाजी
- नवी दिल्ली – कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीचे भीषण चित्र समोर आले आहे. कोरोनाने देशातील 41 लाख तरुणांनी नोकऱ्या गमाविल्याचे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अहवालात म्हटले आहे. बांधकाम आणि कृषी क्षेत्रातील सर्वाधिक कामगारांनी नोकऱ्या गमाविल्याचे आहेत.
सविस्तर वाचा - भीषण बेरोजगारी: कोरोनाने देशातील 41 लाख तरुणांनी गमावल्या नोकऱ्या
- मुंबई - कोरोनाबाधितांच्या संपर्कातील शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घेण्याचे प्रमाण परभणी, नंदूरबार, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये वाढविण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मंगळवारी येथे सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, की कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्याच्या निकट सहवासातील व्यक्तींचा शोध तातडीने घेतला पाहिजे. जेणेकरून संसर्गाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. यासाठी जे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार या सहा जिल्ह्यांमध्ये निश्चित प्रमाणापेक्षा कमी कॉन्टॅक्ट ट्रेसींग झाले आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या आढावा बैठकीत या सहा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याचे निर्देश देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
सविस्तर वाचा - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवावे - आरोग्यमंत्री राजेश टोपे