हैदराबाद - महाराष्ट्रात आज(सोमवार) कोरोनाच्या ८२४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे... कोरोनाच्या उद्रेकामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यंदा होणारी आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा स्थगित केली आहे... ऑक्सफर्ड विद्यापीठातील वैज्ञानिकांनी तयार केलेल्या कोरोना विषाणूवरील लसीला पहिल्या टप्प्यामध्ये यश मिळाले आहे... 2020 एनडी हा लघुग्रह 24 जुलैपर्यंत पृथ्वीच्या कक्षेजवळून जाणार आहे... ग्रामपंचायतीवर प्रशासक प्रकरणी अण्णा हजारांनी वक्तव्य केले आहे... यासह वाचा राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या दहा घडामोडी...
- मुंबई : कोरोनाचा संसर्ग राज्यात वाढतच असून आज(सोमवार) कोरोनाच्या ८२४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात १ लाख ३१ हजार ३३४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहे तर, गेल्या २० दिवसात कोरोनाचे राज्यात ८४ हजार ११८ रुग्ण बरे झाले आहेत. या काळात दिवसाला सरासरी ४२०० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज(सोमवार) ५४६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ७५ हजार २९ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा - राज्यात ८२४० नव्या कोरोना रुग्णांची नोंद, १७६ मृत्यू
- पुणे- हिंजवडीमधील उच्चभ्रू वसाहतीतील कोरोनाबाधित महिलेने पुणे ते दुबई असा विमान प्रवास केला असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित महिला राहात असलेल्या सोसायटीधारकांनी हिंजवडी पोलिसांना पत्र दिले आहे. त्यानुसार पुढील कारवाई करत असल्याचे हिंजवडी पोलिसांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.
सविस्तर वाचा - धक्कादायक..! हिंजवडी येथील कोरोनाबाधित महिलेचा पुणे ते दुबई विमान प्रवास
- दुबई - कोरोनाच्या उद्रेकामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यंदा होणारी आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा स्थगित केली आहे. आज झालेल्या आयसीसीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यंदा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा होणार होती. मात्र, ती आता स्थगित करण्यात आली आहे.
सविस्तर वाचा - यंदाची आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा स्थगित
- लंडन : ऑक्सफर्ड विद्यापीठातील वैज्ञानिकांनी तयार केलेल्या कोरोना विषाणूवरील लसीला पहिल्या टप्प्यामध्ये यश मिळाले आहे. ज्या रुग्णांवर ही चाचणी करण्यात आली, त्यांच्यामधील रोगप्रतिकार शक्ती वाढल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. लॅन्सेंट या वैद्यकीय नियतकालिकामध्ये याबाबत माहिती प्रसिद्ध झाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या या चाचणीचे उद्दिष्ट केवळ लसीची सुरक्षितता तपासणे असते. मात्र, यामध्ये संशोधक हेदेखील पाहत होते, की रुग्णांमधील रोगप्रतिकारशक्तीवर याचा कसा आणि काय परिणाम होतो आहे.
सविस्तर वाचा - ऑक्सफर्डच्या कोरोनावरील लसीची पहिली चाचणी यशस्वी; रुग्णांमध्ये वाढली रोगप्रतिकारशक्ती..
- हिंगोली - प्रेम हे नादान असते... प्रेमात कशाचेच भान नसते.. ना वयाचे.. ना लोक काय बोलतील याचे. म्हणतात ना, प्रेम हे आंधळे असते. अशाच आंधळ्या प्रेमाचा खरा-खुरा अनुभव हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील पार्वतीनगरमध्ये आलाय. ही प्रेमकहाणी ऐकल्यावर तुम्हीही थक्क व्हाल....
सविस्तर वाचा - प्रेमात सर्वकाही माफ असतं.... १७ वर्षीय भाडेकरु मुलासोबत ३६ वर्षीय घरमालकीणीचा पोबारा
- अकोला - मूर्तिजापूर जवळील नागोली नागठणा गावाजवळ एका कंटेनर ट्रक आणि कारचा आज (सोमवार) दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन मुलांसह चौघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी मूर्तिजापूर पोलीस दाखल झाले. जखमींना अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा - अकोल्यात कार व ट्रकची भीषण धडक.. आई-वडिलांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
- मुंबई - 2020 एनडी हा लघुग्रह 24 जुलैपर्यंत पृथ्वीच्या कक्षेजवळून जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून पृथ्वीच्या एवढ्या जवळून कोणताही लघुग्रह गेला नव्हता. येणाऱ्या काळात अशा लघुग्रहांनी पृथ्वीच्या अंतराळातील अस्तित्वाला धोका पोहोचू शकतो. यामुळे जगभरातील अवकाश आणि अंतराळ संस्थांकडून अशा लघुग्रहांना पृथ्वीपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या 2020 एनडी लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाताना स्पष्ट पाहता येणार आहे. त्याचा वातावरणाशी असणारा संबंध, अंतराळातील स्थान तसेच अन्य घटकांबाबत नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांची 'ईटीव्ही भारत'ने घेतलेली विशेष मुलाखत.
सविस्तर वाचा - #२०२०ND: लघुग्रहापासून पृथ्वीला धोका? जाणून घ्या विशेष मुलाखतीतून...
- मुंबई- राज्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. दिवसाला राज्यात 8 ते 9 हजार रूग्ण आढळत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. अशात रुगसेवेतील सर्वात महत्वाचा घटक असलेल्या परिचारिका अर्थात नर्सेसची राज्यात मोठी कमतरता निर्माण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिथे चार रुग्णांच्या मागे एक नर्स असायला हवी तिथे महाराष्ट्रात 50 रुग्णांच्या मागे एक नर्स रूग्णसेवा देत आहे. तर गेल्या कित्येक वर्षात रिक्त पदेच भरली न गेल्याने सर्व विभागात हजारो पदे रिक्त आहेत. त्यातही आता कोरोनामुळे ही परिस्थिती आणखी गंभीर झाली असून आता नर्सेसची रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्याची मागणी नर्सेस संघटनांनी उचलून धरली आहे.
सविस्तर वाचा - धक्कादायक! राज्यात 50 रुग्णांच्या मागे एक नर्स, केरळमधून परिचारिका मागवण्याची नामुष्की
- नागपूर - राज्यात भाजपासह घटक पक्षातर्फे दूध दरवाढ संदर्भात आंदोलन सुरू आहे. तर, दूध दरवाढी संदर्भात उद्या (मंगळवार दि.21 जुलै) रोजी मुंबईत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे पशु व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. उद्याची बैठक नियोजितच होती. मात्र, भाजपने आपले 1 ऑगस्ट रोजी होणारे आंदोलन हे उद्याचा बैठकीला बघून आजच केले. परंतु, भाजपाच्या आंदोलनाला आपल्या शुभेच्छा असल्याची उपरोधिक टीकाही केदार यांनी केली.
सविस्तर वाचा - 'उद्या दूध दरवाढ विषयावर नियोजित बैठक म्हणून भाजपाने आजच आंदोलन उरकले'
- अहमदनगर - ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांचा सल्ला घेण्यात यावा, असे ग्रामविकास विभागाने घटनाबाह्य परिपत्रक काढले आहे. कायद्याची पायमल्ली करणारे हे पत्रक आहे. त्यातून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. या परिपत्रकात दुरूस्ती केली नाही, तर मला पुन्हा शेवटचे आंदोलन करावे लागले, असे अशा अशयाचे पत्र हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज (सोमवार) पाठवले आहे.
सविस्तर वाचा - ग्रामपंचायत प्रशासक नेमणुकीच्या नवीन पद्धतीला अण्णांचा विरोध