जयपूर - कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी संपूर्ण देशाला लॉकडाऊन करण्यात आले आहे. कित्येक राज्यांनी आपापल्या सीमांनाही बंद केले आहे. यादरम्यान परराज्यांमध्ये अडकलेल्या कामगार आणि मजूरांसाठी राज्य सरकारांनी निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. राजस्थानच्या जयपूर शहरात एकूण सात, तर जिल्ह्यात अशी ३४ निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. मात्र, ही निवारा केंद्रे खरंच राहण्यायोग्य आहेत का? इथे राहणारे कामगार आणि मजूर समाधानी आहेत का? याचा आढावा घेतला आहे, ईटीव्हीच्या प्रतिनिधींनी.
ईटीव्ही भारतची टीम मंगळवारी जयपूरमधील पानी पेच येथील एका माध्यमिक विद्यालयातील निवारा केंद्रात पोहोचली. या निवारा केंद्रात एकूण ६० मजूर राहत आहेत. यांमधील काही मजूर राजस्थानच्या इतर भागातील, काही जयपूरमधील रस्त्यांवर राहणारे, काही बिहार तर काही उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत.
यावेळी निवारा केंद्र प्रमुख मनोज फौजदार यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की सरकारने जेवण-पाणी आणि स्वच्छतागृह अशी सर्व व्यवस्था सुरू केली आहे. मात्र, ईटीव्ही भारतच्या टीमने जेव्हा आत जाऊन परिस्थितीचा आढवा घेतला, तेव्हा हे सारे दावे फोल ठरले. निवारा केंद्र पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आल्याचा दावा तर प्रथमदर्शनीच चुकीचा ठरला. तसेच, जेवणाची व्यवस्थाही सरकार नव्हे, तर समाजसेवी संस्थांकडून केली जात होती.
याठिकाणी लहानग्या बाळांसह आलेल्या महिलांना अंथरूणही मिळाले नाही. काही लोक सोबत आणलेल्याच गोष्टी अंथरून त्यावर झोपी गेले, तर काही तसेच फरशीवर झोपले. जिथे अंथरूणाची ही अवस्था, तिथे डासांपासून बचाव करण्यासाठी काय असणार? त्यामुळे इथे राहण्यापेक्षा आपापल्या घरी निघून गेलो असतो, तर बरं झालं असतं अशीच भावना या लोकांच्या मनात होती.
इथे राहणाऱ्या लोकांपैकी काहींना खोकला होता, तर काहींना सर्दी. मात्र, निवारा केंद्रावर डॉक्टरांची व्यवस्थाच नसल्याने या लोकांनाच कोरोनाच्या संक्रमणाचा धोका अधिक दिसून येत होता. याहून धक्कादायक बाब म्हणजे या लोकांची स्क्रीनिंगही करण्यात आले नाहीये...
हेही वाचा : ...म्हणून इव्हांका ट्रम्प यांनी मानले मोदींचे आभार