बलौदाबाजार (छत्तीसगढ) - कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पाऊस, गारपिटीचा सामना करावा लागला आहे. हे सुरू असतानाच टोळधाडीमुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. कृषी विभागाने छत्तीसगढच्या काही जिल्ह्यांमध्ये टोळधाडीची शक्यता वर्तविली आहे. दोन दिवसानंतर लाखो टोळ किटक राज्यात येतील, अशी शक्यता वर्तविली आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही टोळधाड राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातून वेगाने छत्तीसगढमध्ये येत आहे. यापासून पिके वाचवण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपाय सुचवले आहेत.
एक मोठी टोळधाड एका तासात कितीतरी एकर जमिनीवरील पिके नष्ट करू शकते. वाटेत येतील ती पिके खात ही टोळधाड पुढे जात असते. रात्री शेतात थांबून पिके खाऊन सकाळी उडून जातात. एक मादा टोळ एका रात्रीत ५०० ते १५०० अंडी देऊन सकाळी निघून जाते, अशी माहिती कृषी उपसंचालक व्ही.पी चौबे यांनी दिली.
या टोळधाडीपासून वाचण्यासाठी शेतात मेलाथियान ९६ टक्के यूएलव्ही, क्विनोलफोस क्लोरापयरिफोस, फिप्रोनिल ५ टक्के, एससी 6.25 ग्राम प्रति हेक्टरवर फवारणी करू शकतात. तसेच सायंकाळी थाळी वाजवल्याने अथवा फटाक्यांचा आवाज केल्याने टोळीधाडीचा पिकांवरचा हल्ला रोखता येऊ शकतो. कृषी उपसंचालकांनी सर्व अधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच यासाठी लागणाऱ्या सर्व औषधांचा स्टॉक दुकानांत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.