आंतरराष्ट्रीय अभियंता दिन हा ४ मार्च असला, तरी भारतासाठी आजचा दिवसही अभियंता दिनच. १५ सप्टेंबर हा विख्यात अभियंते सर एम. विश्वेश्वरय्या यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्तानेच देशात हा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
आपल्या घरातील मिक्सर असो, वा वॉशिंग मशीन; खेळण्यातील गाडी असो, वा नासाचे रॉकेट. या सर्व गोष्टींमागे अभियंत्यांची मेहनत असते. अभियंत्यांच्या कष्टामुळेच आपली दैनंदिन कामे सोपी करणारी यंत्रे तयार होतात. आपण कोणत्याही क्षेत्रात असो, आपल्याला अभियंत्यांची गरज पडतेच पडते. त्यामुळे, आपल्या जीवनातील एकूण योगदानाबाबत अभियंत्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, आणि त्यांचा गौरव करण्यासाठी आजचा दिवस साजरा करण्यात येतो.
देशातील धरणांचे रुप पालटणारा अवलिया : मोक्शगुंदम विश्वेश्वरय्या..
सर एम. विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१साली कर्नाटकच्या मुड्डेनाहळ्ळी या गावात झाला. मद्रास विद्यापीठात त्यांनी आपली कलेची पदवी मिळवली. तर पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी मिळवली.
त्यानंतर त्यांनी पाटबंधारे सिंचन व्यवस्थेचे पेटंट मिळवले. ज्यामुळे, पुण्याच्या खडकवासला धरणामधील पाण्याच्या संचय क्षमतेत वाढ झाली. याच पद्धतीचा वापर ग्वाल्हेरच्या टायग्रा धरणात आणि म्हैसुरच्या कृष्णराज सागर (केआरएस) धरणामध्ये केला. केआरएस धरणाचे जलाशय हे त्यावेळी आशियातील सर्वात मोठे जलाशय झाले होते.
यानंतर त्यांनी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांचेही पेटंट मिळवले. ज्यांचा वापर टायग्रा आणि केआरएस धरणांमध्ये केला गेला. या पेटंटसाठी त्यांना रॉयल्टीच्या स्वरुपात मोठी रक्कम मिळाली असती; मात्र त्यांनी ती घेण्यास नकार दिला. त्याच पैशांचा सरकारने विकासकामांसाठी वापर करावा अशी मागणी त्यांनी केली.
हैदराबादमध्ये त्यांनी विकसित केलेल्या पूर-संरक्षण यंत्रणेमुळे ते जगभरात प्रसिद्ध झाले.
१९०८मध्ये त्यांना म्हैसूरचे दिवाण म्हणून घोषित करण्यात आले. (त्याकाळी हे देशाच्या पंतप्रधान पदाएवढे महत्त्वाचे पद होते.) तसेच, राज्याच्या विकासकामांसाठीचे सर्व हक्क त्यांना देण्यात आले. त्यांच्या कारकीर्दीत म्हैसूरमधील शेती, सिंचन, उद्योगीकरण, शिक्षण, अर्थ आणि वित्त या सर्वच क्षेत्रांचा भरभरून विकास झाला.
१९१५ला किंग जॉर्ज पाचवा याने त्यांना ब्रिटन इंडियन एम्पायरमध्ये कमांडरपद दिले. १९५५ला त्यांना भारतरत्न देण्यात आला. तर १९६२ साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
कोरोना आणि अभियंते..
कोरोनाशी सुरू असलेल्या लढ्यामध्ये डॉक्टर आणि पोलीस हे फ्रंटलाईनवर असल्याचे आपण पाहत आहोत. मात्र याच काळात अविरतपणे आपले कार्य सुरू ठेऊन, या लढाईमध्ये मोलाचा वाटा उचलणारे अभियंतेही कोविड योद्धेच आहेत!
कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मास्क, पीपीई किट्स, व्हेंटिलेटर्स आणि इतर वैद्यकीय साहित्यांची मागणी वाढली होती. या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी कित्येक कारखाने दिवस-रात्र सुरू होते, आणि या सर्व कारखान्यांना, त्यामधील यंत्रांना सुरू ठेवण्यासाठी सर्व अभियंते मेहनत घेत होते. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे आणि त्यांच्या अभियंत्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
कोरोना रुग्णालयांची कमतरता भासू लागल्यानंतर रेल्वेच्या डब्यांचे रुपांतर रुग्णालयामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच तब्बल पाच हजार एसी डब्यांचे रुपांतर हॉस्पिटल बेड्समध्ये करण्यात आले. यामध्येही कित्येक अभियंत्यांनी दिवसाचे १६-१८ तास काम केले.
टाटा ग्रुपने पीपीई आणि टेस्ट किट्स साठी तब्बल २०० दशलक्ष डॉलर्स एवढे डोनेशन दिले. केवळ तेवढ्यावरच न थांबता, टाटा मोटर्समधील अभियंत्यांनी रुग्णालयांचे सॅनिटायझेशन करण्यासाठी रोबोट्स बनवले. तसेच, विविध बायोटेक कंपन्यांनीही अगदी कमी काळामध्ये टेस्ट किट्स तयार करुन दिले.
कोरोनाशी लढा देण्यासाठी जगभरातील अभियंत्यांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे, आणि ते अजूनही लढत आहेत. कोरोनाच्या लढ्यातील या 'अनसंग हीरो'जना ईटीव्ही भारतचा सलाम!