पाटणा - बिहारच्या गया जिल्ह्यामध्ये शुक्रवारी काही तास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. मात्र, जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी फरार झाले. यानंतर त्यांनी मागे सोडलेले बरेचसे सामान जप्त करण्यात आले आहे.
शुक्रवारी सीआरपीएफ आणि पोलिसांमार्फत गयामधील लुटुआच्या जंगलात सर्च ऑपरेशन सुरू होते. यादरम्यान नक्षल्यांनी पोलिसांना पाहताच गोळीबार सुरू केला. यानंतर पोलिसांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. काही तास दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू होता. मात्र, घनदाट जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलीस अधीक्षक राजीव कुमार मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी यावेळी नऊ मोबाईल, एक वॉकी-टॉकी, एक रेडिओ आणि खाण्या-पिण्याचे काही सामान जप्त केले आहे. यासोबतच एके-४७, एसएलआर, इंसास रायफल या बंदूकींची कित्येक जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत, असेही मिश्रांनी सांगितले.
हेही वाचा : 'हत्तीण प्रकरणावरून केरळची प्रतिमा मलीन करण्यासाठी तिरस्काराचं अभियान चालवंल जातंय'