नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची प्रतिक्षा आज संपणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आज सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. त्यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच देशभरात आचार संहिताही लागू होईल.
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आयोगाने आपली तयारी पूर्ण केली आहे. मागील अनेक दिवसांपासून जनतेचे लक्ष निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यावर लागलेले होते. ही प्रतिक्षा आता संपणार आहे. दिल्लीच्या विज्ञान भवन येथे आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली आहे. निवडणुकांच्या तारखांसह किती टप्प्यात या निवडणुका पार पाडल्या जातील यावरही लक्ष लागून राहणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकांसोबत आंध्र प्रदेश, सिक्किम, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांवरही आयोग महत्त्वाची घोषणा करु शकते.
लोकसभेच्या निवडणुकांसाठी एप्रिल ते मे दरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे. मेच्या शेवटच्या हप्त्यामध्ये मतमोजणी होण्याचे संकेत आहेत. तर, जवळपास सात ते आठ टप्प्यांमध्ये निवडणुका होऊ शकतात. तारखा जाहीर झाल्यानंतर देशामध्ये आचार संहिता लागू होणार आहे. त्यामुळे सरकार कोणतेही राजकीय निर्णय घेऊ शकणार नाही. तसेच कोणत्याही विकास कामाचे उद्घाटन करण्यावर बंदी असेल.