नवी दिल्ली - दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरविणाऱ्या हवाला ऑपरेटरची संपत्ती सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) जप्त केली आहे. एझाज हुसेन ख्वाजा असे या हवाला ऑपरेटरचे नाव आहे. 2.05 किलो आरीडएक्स आणि 49 लाख रोख रकमेसह त्याला 2006 साली अटक करण्यात आले होते. त्याचे दहशतवाद्यांशी संबध असल्याचेही तपासात उघड झाले होते.
मनी लाँड्रीग प्रतिबंधक कायदा 2002 कायद्यांतर्गत ही कारवाई केल्याचे ईडीने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे. ख्वाजा हा काश्मिरातील बारामुल्ला जिल्ह्यातील रहिवासी असून 2006 च्या दहशतवादी आर्थिक मदतीप्रकरणी त्याची 7 लाख 32 हजारांची संपत्ती जप्त करण्यात आल्याचे पत्रकामध्ये म्हटले आहे.
दिल्लीतील जंगपुरा भागातील फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. तर त्याच्या पत्नीच्या बँक खात्यातील रक्कम जप्त करण्यात आली आहे. आजच्या बाजार भावानुसार जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत जास्त असल्याचे ई़डीने म्हटले आहे. ख्वाजा हवाला संबधीच्या अनेक अवैध कारवायांमध्ये गुंतला असल्याचे तपासात उघड झाले, असे ईडीने म्हटले आहे.
या हवाला व्यवहारातून त्याने साडेआठ लाख रुपये कमावले. हवाला ऑपरेटर म्हणून काम करत असताना तो मुख्तियार अहमद भट्ट या पाकिस्तानातील लष्कर- ए- तोयबाच्या दहशतवाद्याच्या संपर्कात होता. तसेच पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयशीही त्याचे संबध होते.