नवी दिल्ली - मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली आहे. भाजप उमेदवार इमरती देवी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर आयोगाने त्यांना ही नोटीस पाठवली असून दोन दिवसांच्या आत उत्तर मागविले आहे. कमलनाथ यांनी महिला उमेदवारावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला, तर काँग्रेस नेते राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली.
काय आहे प्रकरण?
राज्यातील डबरा मतदारसंघात एका सभेदरम्यान कमलनाथ यांनी भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांना 'आयटम' म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात खळबळ उडाली. भाजपाने या वक्तव्यावरून काँग्रेसची कोंडी केली आहे. कमलनाथ यांच्या वक्तव्याचा विरोध म्हणून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोन तासाचे मौन पाळले होते. तसेच त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पत्र लिहून निषेध व्यक्त केला होता. महिलांबाबत काँग्रेसची अशी मानसिकता असल्याचे मुख्यमंत्री चौहान म्हणाले.
मध्यप्रदेशात २८ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका आहेत. भाजपाला बहुमतासाठी आठ जागा हव्या असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेस पक्षातून बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत २० पेक्षा जास्त आमदारांनी पक्ष सोडला होता. त्यानंतर कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार कोसळले. राजकीय उलथापालथ झाल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सत्तेत आली. त्यामुळे आता भाजपा सरकार खाली खेचण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.