नवी दिल्ली - 'इबोला' विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वापरण्यात आलेले 'रेमडेसिविर' हे औषध कदाचित कोरोनाचाही प्रसार रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकते, असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने व्यक्त केले आहे. कोविड-१९ ला कारण ठरणाऱ्या सार्स-कोव-२ या विषाणूच्या वाढीला आळा घालण्यासाठी या औषधाचा उपयोग होऊ शकतो, असे परिषदने म्हटले आहे.
'न्यू इंग्लंड जरनल ऑफ मेडिसिन' या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. कोरोनाच्या तीनपैकी दोन अतिगंभीर रुग्णांनी - जे व्हेंटिलेटरवर होते -रेमडेसिविर या औषधाला चांगला प्रतिसाद दिला. या औषधाच्या वापरानंतर त्यांच्यामध्ये होत असलेल्या विषाणूची वाढ थांबल्याचे दिसून आले. या संशोधनाचा दाखला देत, वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख आर. गंगाखेडकर यांनी सांगितले, की याच औषधाचा वापर करून आपण कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करु शकतो.
कोरोना रुग्णांवर करण्यात आलेले हे संशोधन ही वैद्यकीय चाचणी नसून, केवळ एक निरिक्षण अभ्यास होता. यामध्ये असे आढळून आले, की तीनपैकी दोन अतीगंभीर रुग्णांना या औषधांच्या वापरांनंतर व्हेंटिलेटरची गरज भासली नाही. याबाबात जागतिक आरोग्य संस्थेच्या 'एकता चाचणी'मध्ये अधिक संशोधन सुरू असून, याबाबत अधिक माहिती मिळताच ती जाहीर केली जाईल असेही गंगाखेडकर यांनी सांगितले.
यासोबतच त्यांनी सांगितले, की सध्या हे औषध भारतात उपलब्ध नाही. देशातील कोणती औषध कंपनी या औषधाचे उत्पादन करेल का, याबाबत केंद्र सरकार विचारणा करत आहे.
हेही वाचा : COVID-19 : देशातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी, पहा एका क्लिकवर..