पणजी - लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी गोवा सरकार काजू बी, नारळ आणि हळसाणे या हंगामातील प्रमुख पिकांना गोवा सरकार किमान आधारभूत किंमत देणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्यांनी सहमती दर्शवली आहे, अशी माहिती गोव्याचे उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी दिली.
कवळेकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची महालक्ष्मी या त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कवळेकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. 'यापूर्वी काजू बीला आधारभूत किंमत दिली नव्हती. परंतु, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी यावर्षी प्रथमच आधारभूत किंमत द्यावी, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर मांडला होता. ज्याला त्यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे काजू बीला प्रतिकिलो 100 रुपयांऐवजी 125 रुपये, नारळाला 10 रुपये नगाऐवजी 12 रुपये आणि हळसाणे 70 ऐवजी 100 रूपये प्रतिकिलो द्यावे, असे सूचविण्यात आले असून तशी किंमत दिली जाईल. मागील चार वर्षांत या किंमतीत वाढ केली नसल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून ही वाढ किमान 25 टक्के असावी, असे सुचविले आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता देत लेखा विभागाकडे याची फाईल पाठवली आहे,' असे ते म्हणाले.
खलाशांना परत आणण्याबाबत चर्चा
'विदेशात अडकलेल्या गोमंतकीय खलाशांना कशा प्रकारे परत आणता येईल याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. यापूर्वी याविषयी दूरध्वनीवरून बोलणे सुरूच होते. कारण गोव्याच्या अनेक भागातून चिंतातूर पालकांची या संदर्भात दूरध्वनी येत आहेत. या खलाशांना कशा प्रकारे आणायचे याविषयी मुख्यमंत्री टप्पे निश्चित करत आहेत. त्यांना परत आणल्यानंतर किनारी भागातील हॉटेलमध्ये कशाप्रकारे क्वारंटाईन करता येईल याचा सरकार विचार करत आहे. तेव्हा गोमंतकीय खलाशांना टप्याटप्याने कसे परत आणता येईल, यावर चर्चा झाली आहे,' असे कवळेकर म्हणाले.