नवी दिल्ली - देशात ‘क्वांटम टेक्नॉलॉजी’ आणि विज्ञानाचा मोठ्या प्रमाणात विकास करण्याची गरज डिपार्टमेंट ऑफ सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे सचिव प्रो. आशुतोष शर्मा यांनी व्यक्त केली आहे. यासाठी देशातील उद्योगांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया(असोचेम)द्वारे आयोजित करण्यात आलेल्या क्वांटम टेक्नॉलॉजी कॉन्क्लेव्ह (IQTC2020) या ऑनलाइन आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये शर्मा बोलत होते.
'क्वेस्ट टॉवर्डर्स इंडियाज क्वांटम सुप्रिमसी' असा या वेबिनारचा विषय होता. 'भविष्य क्वांटम तंत्रज्ञान आणि उद्योगांचे आहे. सायबर क्षेत्र आणि डिजिटल तंत्रज्ञान यांच्या एकत्रिकरणाने संपर्क व्यवस्था, कॉप्युटिंग, निर्णय क्षमता विकसित करण्याची गरज शर्मा यांनी व्यक्त केली.
क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीची माहिती शर्मा यांनी दिली. ‘तीन वर्षांपूर्वी विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने ’फ्रंटियर टेक्नॉलॉजी' नावाचा विभाग सुरु केला. त्याद्वारे सायबर आणि फिजिकल क्षेत्रात प्रगती करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. त्या मिशनअंतर्गत देशात 21 टेक्नॉलॉजी हब आणि 4 रिसर्च पार्क उभारण्यात आले आहेत. त्याद्वारे क्वांटम तंत्रज्ञानात प्रगती कऱण्यात येत असून उद्योग आणखी सशक्त होण्यास मदत मिळणार असल्याचे शर्मा म्हणाले.
21 हबद्वारे संशोधन आणि विकास, मन्युष्यबळ निर्मिती, प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रात ज्ञान निर्माण करण्यापासून त्याचा वापर कसा करता येईल, यावर काम सुरु आहे. भारत सरकारने 8 हजार कोटींचे नॅशनल मिशन ऑन क्वांटम टेक्नॉलॉजी सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. यातून आत्मनिर्भर भारत अभियानालाही चालना मिळणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.