सिलचर (आसाम) - जगभरात कर्करोगाची समस्या आणि याने ग्रासलेले रुग्ण वाढत आहेत. आसाममध्ये या कर्करोगावर इलाज करणारे एक विशेष डॉक्टर आहेत. त्यांच्या सेवेकडे त्यांचे रुग्ण 'परमेश्वराचे प्रेम' या रुपात पाहतात. डॉ. रवी कन्नन असे त्यांचे नाव असून ते दक्षिण भारतातले कर्करोग तज्ज्ञ आहेत. 2007 साली ते आसामला गेले.
डॉ. कन्नन यांनी सिलचरच्या मेहरपूरमध्ये कॅचर कर्करोग रुग्णालयात काम करायला सुरुवात केली. ते चेन्नईत काम करत होते, तेव्हा त्यांनी या रुग्णालयाबद्दल ऐकले होते. याच कॅचर कर्करोग रुग्णालयाने त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी तिथे काम करायला होकार दिला. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांच्या दृष्टिकोनातून आसाम ही दहशतवाद आणि सतत पूर येणारी भूमी होती.
'मी चेन्नईत काम करत होतो. 2007 साली मी इथे आलो, तेव्हा कॅचरमध्ये कर्करोगावरील उपचारांची कोणतीच सुविधा नव्हती. केवळ गुवाहाटीमध्ये डॉ. बी. बरूआ कर्करोग संस्था होती. सिलचरहून गुवाहाटीला जाण्यात लोकांना बऱ्याच अडचणी येत असत,' असे डॉ. कन्नन यांनी सांगितले.
हेही वाचा - भारतीय सैन्याने केली गलवान खोऱ्यात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या स्मारकाची निर्मिती
डॉ. कन्नन यांच्या कुटुंबीयांनी त्यांना आसामला जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते 2007 मध्ये आसामला गेले आणि त्यांनी कॅचर कर्करोग रुग्णालयासाठी काम करायला सुरुवात केली. आत्तापर्यंत कन्नन यांनी 70 हजार हून अधिक रुग्णांवर उपचार केलेत. त्यांनी असंख्य रुग्णांना फक्त जीवनच दिलं नाही तर, त्यांना या जीवघेण्या आजारावर मात करून जिवंत राहण्याचा भरवसाही दिला.
'बराकच्या दऱ्याखोऱ्यांतील सर्वसामान्य लोक एक संस्था स्थापन करण्यासाठी पुढे आले आणि संयुक्तपणे त्यांनी हे रुग्णालय उभारलं. जगात अशी उदाहरणं खूप कमी आहेत, जिथे सर्वसामान्य लोकांनी एकत्र येऊन इतकी मोठी संस्था स्थापन केली. सुरुवातीला आमच्या टीममध्ये फक्त 23 जण होते आणि 20 खाटांचे हे रुग्णालय होते. मात्र, हळूहळू लोकांची संख्या वाढत गेली आणि आता आम्ही सर्वजण मिळून १५० जणांची टीम आहे. ही अतिशय जबरदस्त टीम आहे. एकटा माणूस फार काही करू शकला नसता पण या टीमने सर्व काही करून दाखवलं. डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, सफाई कामगार अशा सर्वांनी झपाटून काम केलं. या टीममधील प्रत्येक सदस्याचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत,' असे सांगताना कन्नन यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.
उपचारांच्या खर्चात अनुदान देण्याव्यतिरिक्त उपचारांनंतर घेतली जाणारी काळजी ही कॅचर कर्करोग रुग्णालयाची खासियत आहे. प्रत्येक रग्णाची तपासणी न चुकता व्हावी, यासाठी इथले सहाय्यक कर्मचारी आणि प्रत्यक्ष उपचार करणारे आरोग्य कर्मचारी प्रत्येक रुग्णावर सुरू असलेल्या उपचारांवर लक्ष ठेवतात.
हेही वाचा - दिल्लीतील प्रदूषण तपासणी केंद्रांबाबत अनेक तक्रारी; सरकारने घेतले 'हे' निर्णय