नवी दिल्ली - अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा बुधवारी अर्थात 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत होणार आहे. या कार्यक्रमात राम मंदिर उभारण्यासाठी पुढाकार घेतलेल्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना अद्याप मंदिरातील भूमिपूजनात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळालेले नाही. सूत्रांनी याबाबत माहिती दिली. भूमिपूजनासाठी फक्त चार दिवस उरले असतानाही अडवाणी यांना अधिकृतपणे आमंत्रण न देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी नेत्यांना आमंत्रित करण्याचे काम श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे काम आहे. ट्रस्टच्या वतीने केवळ निवडलेल्या अनेक लोकांना सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना भूमिपूजन सोहळ्यासाठी आमंत्रित केले की नाही, याबाबत माहिती नाही, असे विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) सह सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी शनिवारी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला ई-भूमीपूजन करण्याचा सल्ला दिल्यावरून सुरेंद्र जैन यांनी त्यांच्यावर टीका केली. राम मंदिराचे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांचे होते. मात्र, या पवित्र सोहळ्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने त्यांच्या आत्म्याला दुखावले असले, असे जैन म्हणाले.
दरम्यान अयोध्येतील श्री राम जन्मभूमीत प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे. येत्या बुधवारी पंतप्रधान मोदी सकाळी 11:30 वाजता अयोध्येत पोहोचून भाषण करतील. जवळपास दोन तास हा कार्यक्रम चालणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेत्यांसह अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत