होशंगाबाद (मध्य प्रदेश) - मानवांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी घेण्याबद्दल तुम्ही ऐकले असेल. परंतु, मध्य प्रदेशात चक्क एका कुत्र्याची डीएनए टेस्ट घेतली जात आहे. कुत्र्याची ओळख पटवण्यासाठी असे केल्याची ही पहिलीच घटना असेल. होशंगाबाद पोलीस या लॅब्राडोर कुत्र्याचा खरा मालक ओळखण्यासाठी त्याची डीएनए टेस्ट करून घेत आहे. जरी हे चमत्कारिक वाटले तरी, एका कुत्र्यावर होशंगाबाद येथील दोन व्यक्तींनी हक्क सांगितल्यामुळे अखेर कुत्र्याची डीएनए टेस्ट करण्याची वेळ आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तीन महिन्यांपूर्वी हरवला होता कुत्रा
तीन महिन्यांपूर्वी, हरवलेल्या लॅब्राडोर कुत्र्यावर आपला हक्क सांगणाऱ्या शादाब खान यांनी कुत्र्याचे नाव 'कोको' असल्याचे म्हटले आहे. तर, प्रीतिक शिवहरे यांनी हा आपला कुत्रा असून त्याचे नाव टायगर असल्याचे सांगितले आहे. वास्तविक, होशंगाबाद येथील रहिवासी शादाब खान सांगतात की, त्यांचा लॅब्राडोर कुत्रा सुमारे तीन महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्यांनी ग्रामीण भागातील पोलीस ठाण्याला माहितीही दिली होती. त्यानंतर, 18 नोव्हेंबरला शादाब यांना त्यांचा कुत्रा मालाखेडी येथील एका ठिकाणी बांधला आहे, असे समजले. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
हेही वाचा - भाकरी विकणाऱ्या महादेवींची प्रेरणादायी कहाणी; २०० महिलांना दिलाय रोजगार
दोघांनी आपणच कुत्र्याचे मालक असल्याचा केला दावा
होशंगाबाद ग्रामीण भागातील पोलिसांनी कुत्र्याला ताब्यात घेऊन त्याला पोलीस ठाण्यात ठेवले आहे. तसेच, शादाब खानकडील कागदपत्रे पाहून कुत्रा त्यांच्या ताब्यात दिला. तर, 19 नोव्हेंबरच्या दुसर्या दिवशी प्रीतिक शिवहरे यांनी कुत्र्याबद्दल पोलीस ठाण्यात आपला दावा सादर केला की, हा कुत्रा त्यांचा आहे. तेव्हापासून दोन्ही बाजूंनी या कुत्र्यावर आपले हक्क सांगण्यात आले आहेत.
कुत्र्याची होणार डीएनए टेस्ट
आता या कुत्र्याची डीएनए टेस्ट करण्यात येणार आहे. या कुत्र्याच्या पित्याच्या रक्ताचा नमुना घेण्यात आला आहे. त्याच्याशी डीएनए मॅच झाल्यानंतर कुत्रा त्याच्या खऱ्या मालकाकडे देण्यात येईल. येथील पोलीस टीआय हेमंत श्रीवास्तव यांनी शुक्रवारी रात्री उशिरा अहवाल तयार करून जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठविला. रात्री उशिरा डॉक्टरांनी या कुत्र्याच्या रक्ताचा नमुना घेतला. कुत्र्याच्या पित्याला शोधण्यासाठी पशुवैद्यांची टीम होशंगाबादहून पंचमढी येथे गेली आहे. तेथून कुत्र्याच्या पित्याच्या रक्ताचा नमुना घेऊन तो डीएनएशी जुळवून पाहण्यासाठी लॅबमध्ये नेला जाणार आहे. यानंतर खरा मालक ओळखला जाईल.
मालकाच्या वादामुळे कुत्र्याला पोलीस ठाण्यात राहण्याची वेळ
दोन मालकांच्या वादामुळे कुत्र्याला पोलीस ठाण्यात बांधण्याची वेळ आली. येथे कुत्रा अनेक तास पोलीस कोठडीत होता. यादरम्यान कुत्रा आजारी पडला. त्याला 105 डिग्रीपर्यंत ताप आला होता. तसेच, त्याला लूज मोशनचीही सुरुवात झाली होती. त्यानंतर त्याच्यावर पशुवैद्यकीय विभागाने उपचार केले. आता पशुवैद्यकीय विभागच त्याच्याकडे लक्ष देत आहे. पोलीस सध्या डीएनए अहवालाची वाट पाहत आहेत. डीएनएचा अहवाल आल्यानंतरच कुत्रा त्याच्या खऱ्या मालकाकडे सोपविला जाईल.
हेही वाचा - 'जबाबदारीची जाणीव असलेले लोकच जीवनात यशस्वी होतात'