आगरा ( उ.प्र)- अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ट्रम्प हे आग्र्यातील भव्य ताज महलला देखील भेट देणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आग्रा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. आग्रा येथील खेरीया विमानतळ ते ताजमहल दरम्यानच्या रस्त्याची साफसफाई आणि रंगरंगोटी केली जात असल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी अरूण कुमार यांनी दिली.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते अहमदबादला भेट देणार असून तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अहमदाबादच्या मोटेरा स्टेडिअममध्ये संयुक्त सभेला संबोधन करणार आहेत. सभेत ७० लाख लोकांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, अमेरिकेचे भारताबरोबर काही व्यापारी करार देखील होण्याची शक्यता आहे. या दौऱ्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी मिलेनिया ट्रंप यांच्याबरोबर आग्र्याला देखील जाणार आहेत. राष्ट्रपती ट्रम्प आग्र्यात दोन तास थांबणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ट्र्म्प यांच्या आग्रा दौऱ्यासाठी उत्तर प्रदेश सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय सज्ज आहे.
हेही वाचा- आम्ही 'तो' व्हिडिओ सार्वजनिक केला नाही, जामिया विद्यापीठाचे स्पष्टीकरण