हजारीबाग - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेवकांच्या लहान मुलांसाठी हजारीबाग जिल्हा प्रशासनाने हजारीबाग वैद्यकिय महाविद्यालय परिसरात समाजकल्याण विभागाच्या सहकार्याने बाल संगोपन केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात मुलांकडे लक्ष देण्यासाठी महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवण्यात आले आहेत. यामुळे रुग्णालय आणि आरोग्य केंद्रात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे लक्षात घेऊन बाल संगोपन केंद्र सुरू करत असल्याचे डॉ. भुवनेश प्रताप सिंह यांनी सांगितले.
बाल संगोपन केंद्रात मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक खाद्य पदार्थ, दूध, डाळ, यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रमाणित सॅनिटायझर, कर्मचाऱ्यांसाठी मास्क, हॅण्ड वॉश, औषधे,स्वच्छता ठेवणे याची पूर्ण काळजी घेणार असल्याचे समाज कल्याण विभागाचे अधिकारी शिप्रा सिंह यांनी म्हटले.
हजारीबाग वैद्यकिय महाविद्यालयात बाल संगोपन केंद्र सुरू केल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावेल. त्यांच्या मनात मुलांविषयी काळजी राहणार नाही ते चिंतामुक्त होऊन वैद्यकीय सेवा देतील, असे वैद्यकिय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. सिग म्हणाले.