गाझियाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण सरकारला मदत म्हणून आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. अशीच मदत करण्यासाठी शारीरिक अपंगत्व नाकारत गाझियाबाद येथील एका महिलेने कोरोना संसर्गाविरुद्धच्या लढ्यात हातभार लावण्याचा प्रण केला आहे.
देशात झपाट्याने पसरत असलेल्या घातक कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी मुर्ती देवी यांनी शपथ घेतली आहे. त्यांनी शारीरिक दिव्यांग असतानाही मास्कची निर्मिती करून ते मास्क गरजुंमध्ये मोफत वाटप करायला सुरुवात केली.
मूर्ती देवी यांना वयाच्या 14 व्या वर्षी झालेल्या अपघातात हात गेल्याने दिव्यांगत्व आले. मात्र, या घटनेमुळे जीवन थांबत नसून त्यांनी हे दिव्यांगत्व आपल्यासाठी कधीही अडथळा ठरू नये, असा निश्चय केला. आणि शारीरिक असमर्थतेवर मात करत स्वत:ची जगण्याची इच्छाशक्ती कायम ठेवली आहे. मास्क तयार करण्याबाबतचा विचार मनात कसा आला याबद्दल बोलताना मूर्ती देवी सांगतात, एक दिवस मला रस्त्यावर एक महिला पोलीस कर्मचारी तिच्या लहान मुलाला धरून दिसली. त्या दोघांकडेरही मास्क नव्हते. या परिस्थितीत ते दोघेही त्यांचा जीव धोक्यात घालत असल्याचे मला जाणवले. त्यानंतर, मी स्वत: मास्क तयार करून गरजू आणि कोरोनाशी लढा देण्यासाठी, देशसेवेसाठी जीवाचे रान करणाऱ्यांना मोफत वाटप करण्याचे ठरवले.
माझे हात मला फारसा पाठिंबा देत नाहीत परंतु मला या भीषण परिस्थितीत अडकलेल्यांना मदत करण्यासाठी हे मास्क बनवायचे आहेत, असे म्हणत त्या मास्कचे वितरण करताहेत. या आजाराचा त्यांनाही धोका आहे, याची कल्पना असूनही, मूर्ती स्वत: तयार केलेले मास्क घेऊन कोरोना योद्ध्यांना तसेच गरजुंना मोफत वितरण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'व्होकल फॉर लोकल' यातून प्रेरणा घेऊन, नागरिकांनीही तिच्यासारख्या लोकांना आधार देण्यासाठी स्वदेशी उत्पादने वापरावीत अशी त्यांची इच्छा आहे.
मास्कच्या वितरणासोबतच नागरिकांनीही कोरोनाबद्दल जागरु राहुन याबाबत जागृती करावी. तसेच घरातच राहुन या रोगावर आळा बसविण्यास मदत करावी, अशी त्यांची इच्छा आहे. तर, स्वत:ला आलेल्या शारीरिक कमतरतेविषयी लाज न बाळगता त्या सोबत कशाप्रकारे पुढे जाता येईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ईच्छाशक्ती असली तर, आपण कठीणातले कठीण काम करायला पुढे धजावतोच असेही मूर्ती देवी म्हणाल्या.