नवी दिल्ली - अमेरिकेने ओसामा बिन लादेनवर केलेल्या कारवाईचे सबळ पुरावे जगासमोर ठेवले होते. त्याच प्रमाणे आपणही आपल्या एअर स्ट्राईकच्या बाबतीत करायला हवे, असा खोचक सल्ला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपला दिला आहे. भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या हवाई दलाच्या कारवाईसंदर्भात ते बोलत होते.
दिग्विजय सिंह म्हणाले, हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या कारवाईवर मी प्रश्न उपस्थित करत नाही, मात्र, या कारवाईचे सॅटेलाईट फोटो मिळणे शक्य आहेत. ज्याप्रकारे अमेरिकेने ओसामा कारवाईचे सबळ पुरावे जगासमोर ठेवले, तसेच आपणही आपल्या एअर स्ट्राईकच्या बाबतीत करायला हवे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारीला पाहाटेच्या सुमारास पाकिस्तानमधील बालाकोट तर पाकव्याप्त काश्मिरातील चकोटी आणि मुझफ्फराबाद येथे कारवाई केली. भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज-२००० लढाऊ विमानांच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संबंधित दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्धवस्त करण्यात आले आहेत. या हल्ल्यात ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे बोलले जात आहे.