नवी दिल्ली - आम्हांला जनतेचे समर्थन मिळत आहे. तसेच दिल्लीवासियांनी यावेळी भाजपचे सरकार स्थापन करण्याचे ठरवले आहे, असा विश्वास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भाजपचे अनेक नेते सध्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार करत आहेत. या नेत्यांचा निवडणुकीवर काही परिणाम होईल का? या प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 8 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 11 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. यासाठी अनेक पक्षांचे नेते प्रचारात सहभागी झाले आहेत. यात भाजपचे अनेक मुख्यमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री यांचा समावेश आहे. देवेंद्र फडणवीस हे रविवारी लक्ष्मीनगर विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवार अभय वर्मा यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेत सहभागी झाले होते.
हेही वाचा - केंद्रीय अर्थसंकल्पात दिसली मोदींच्या राजकीय उद्देशाची झलक..
फडणवीस पुढे म्हणाले, आम्ही ज्या विभागात प्रचारासाठी जात आहोत, त्याठिकाणी आम आदमी पक्षाच्या सरकारने केलेली कोणतीही कामे निदर्शनास येत नाही आहेत. गेल्या 5 वर्षात त्यांनी कोणती कामे केली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच आम्ही आमचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. त्यात ज्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. त्या घेऊन आम्ही जनतेसमोर जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - श्रीनगरमध्ये सीआरपीएफ जवानांवर ग्रेनेड हल्ला; ३ जण जखमी
तसेच या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. यावर आम आदमी पक्षाने टीका केली आहे. अशी वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांवर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. मात्र, आप नेते अरविंद केजरीवाल याच्यावर राजकारण करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. आपल्या नेत्यांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. ते या वक्तव्यांचे समर्थन करणार का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, भाजपची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे. तसेच या वक्तव्यांचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ते म्हणाले.