नवी दिल्ली - देशात सध्या कोरोना विषाणूची दहशत आहे. सरकारकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, या सर्व उपाययोजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असते. हे काम देशातील माध्यमांद्वारे चोखपणे पार पाडले जात आहे. पत्रकार वार्तांकनासाठी घराबाहेर पडत असल्याने पत्रकारांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष विमा योजनेत मीडियाकर्मींचाही समावेश करण्याची मागणी दिल्लीतील मान्यताप्राप्त पत्रकार संघटनेने सरकारकडे केली आहे.
पत्रकार संघटनेने पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहले आहे. 'कोरोना महामारीविरोधातील या लढाईत पत्रकार आपले योगदान देत आहेत. आपला जीव धोक्यात घालून परिस्थितीचे वार्तांकन करत असल्याने त्यांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचार्यांसाठी जाहीर केलेल्या विशेष विमा योजनेत मीडियाकर्मींचाही समावेश करावा', अशी विनंती पत्रकार संघटनेन केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल पत्रकार संघटनेनं आभार व्यक्त केले.
दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पुढील तीन महिन्यांसाठी ५० लाखांचा आरोग्य विमा जाहीर केला. यामध्ये डॉक्टर्स, पॅरामेडिक स्टाफ, आशा वर्कर्स आणि सॅनिटरी वर्कर्सचाही समावेश आहे. याचा सुमारे २० लाख लोकांना फायदा होईल.