भोपाळ - मध्य प्रदेशातील निमाडच्या आदिवासीबहुल भागात आढळणारा कडकनाथ कोंबडा रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात पूरक ठरतो, असे दिसून आले आहे. कोरोना कालावधीत रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धती अवलंबत आहेत आणि त्यामुळेच कडकनाथ कोंबडा/कोंबडी चिकनची मागणी देखील वाढली आहे.
मध्य प्रदेशचा कडकनाथ कोंबडा रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्याबरोबरच कमी चरबीसाठी प्रसिद्ध आहे. हे चिकन प्रथिनांनी समृद्ध आहे, हृदय-श्वासोच्छ्वासाच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी त्याचा फायदा होतो. कोरोना कालावधीत रोग प्रतिकारशक्ती वाढविणे हे मुख्य लक्ष्य आहे. यामुळे या चिकनची मागणीही वाढली आहे आणि हे लक्षात घेता राज्य सरकारने त्याचे उत्पादन व विक्री वाढविण्यासाठी एक विशेष आराखडा तयार केला आहे. यामुळे कुक्कुटपालकांचे उत्पन्नही वाढेल. कडकनाथचे शरीर, पंख, पाय, रक्त, मांस सर्व काळे असते. कडकनाथ चिकन हे पशुधन आणि कुक्कुट विकास महामंडळाच्या अधिकृत विक्रेता चिकन पार्लरमध्ये उपलब्ध झाले आहे.
कुक्कुटपालनास चालना
कडकनाथचे मूळ झाबुआ, अलिराजपूर, बरवानी आणि धार जिल्ह्यातील नोंदणीकृत कडकनाथ पोल्ट्री समित्यांच्या अनुसूचित जमातीतील 300 सदस्यांना सहकाराच्या माध्यमातून कडकनाथ कुक्कुटपालनास चालना देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कडकनाथच्या मूळ प्रजातीमुळे झाबुआ जिल्हा यापूर्वीच जी.आय. टॅगसाठी निवडला गेला आहे. या योजनेत 33 टक्के महिलांना सामावून घेण्यात आले आहे, असे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव जे. एन. कॉन्सोटिया म्हणाले.
धोनीच्या फार्म हाऊसमध्ये कडकनाथ
प्रत्येक निवडलेल्या लाभार्थ्यांना 28 दिवसांची 100 कोंबडी, औषध, धान्य, प्रशिक्षण तसेच त्यांच्या निवासस्थानावरील शेड मोफत देण्यात येईल. राज्य पशुधन व कुक्कुट विकास महामंडळ पालन, प्रशिक्षण, देखरेख, औषध पुरवठा व विपणनाची व्यवस्था सुनिश्चित करेल. प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीनेही कडकनाथची पिल्ली बुक केली आहेत. येत्या काही दिवसात धोनीच्या रांची येथील फार्म हाऊसमध्ये या कोंबड्या दिसणार आहेत.