नवी दिल्ली - मोटार वाहन कायद्यात दुरूस्ती केल्यानंतर वाहन चालकांना अव्वाच्या सव्वा दंड भरावा लागतोय. नव्या नियमानुसार जास्तीत जास्त २५ ते ३० हजार रुपये दंड केला जाईल, असा तुमचा अंदाज असेल तर तो चुकीचा आहे. दिल्लील एका ट्रक चालकाला वाहतूक पोलिसांनी केलेल्या दंडाची रक्कम एकून तुमचे डोळे फिरल्याशिवाय राहणार नाही. एका ट्रक चालकाला नियमापेक्षा जास्त माल गाडीत भरल्यामुळे त्याला तब्बल १ लाख ४१ हजार ७०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.
दिल्ली वाहतूक पोलिसांनी शहरातील रोहिणी चौकामध्ये ही कारवाई केली. रोहिणी चौकामध्ये वाहनांची तपासणी सुरू असताना हा ओव्हरलोड ट्रक थांबवण्यात आला होता. हा ट्रक राजस्थानमधील असून त्याला केलेल्या दंडाची पावती व्हायरल होत आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दंड करण्यात आलेल्या ट्रकचा नंबर आरजे ७ जीडी ०२३७ आहे. ही आत्तापर्यंतची सर्वात महागडी दंडाची पावती असावी, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
मंगळवार संध्याकाळपर्यंत दंडाच्या पावतीचा फोटा दिल्लीमध्ये व्हायरल झाला होता. त्यानंतर सबंध उत्तर भारतात हा फोटा व्हायरल झाला. या घटनेनंतर वाहनचालक आता रोहिणी चौकात यायला घाबरले नाही तर नवलंच.