नवी दिल्ली - दिल्ली पोलीस प्रजासत्ताक दिनाच्या तयारीला लागले असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त एस. एन श्रीवास्तव यांनी आढावा घेतला. २६ जानेवारीला देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. दिल्लीतील या कार्यक्रमास विशेष महत्त्व असते. तसेच या वर्षी दिल्लीत केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढणार असून कोणतीही अनूचित घटना घडू नये म्हणून पोलीस तयारीला लागले आहेत.
दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी उपाययोजना -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद विरोधी कारवाया रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी तयारीचा आढावा घेतला. सोबतच अमली पदार्थ तस्करी, चोऱ्या, जुगार, अवैध वाहतुकीशीसबंधीत गुन्हेगारांची माहिती घेत योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या. महिला आणि बालकांवरील प्रलंबित गुन्ह्यांचा त्यांनी आढावा घेतला. पॅरोलवर असलेले कैदी, तडीपार व्यक्ती आणि नुकतेच तुरुंगातून सुटलेल्या व्यक्तींची माहिती आयुक्तांनी घेतली.
दिल्ली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर -
या बैठकीला पोलीस आयुक्त, कायदा सुव्यवस्था, गुप्तचर विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. राजधानी दिल्ली कायम दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असते. त्यामुळे दरवर्षी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत असतो. मागील वर्षी झालेल्या स्वातंत्र्य दिनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत कार्यक्रम साजरा करण्यात आला. कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना कार्यक्रमास उपस्थित राहता आले नव्हते.