दिल्ली - ईशान्य दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज दिल्ली पोलिसांद्वारे मार्च काढण्यात आला. यावेळी अमर कॉलनी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.
अमर कॉलनी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अनंत कुमार गुंजन यांच्या नेतृत्वात कॉलनीच्या वेगवेगळ्या भागात मार्च काढण्यात आला. यावेळी शांतता भंग केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असाही इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
काय आहे दिल्ली हिंसाचार प्रकरण -
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राजधानी दिल्ली मागील ३ दिवसांपासून धगधगत आहे. जाळपोळ आणि हिंसाचारात आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील ईशान्य भागातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे.
नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे आणि समर्थन करणारे दोन गट एकमेकांसमोर आल्याने २३ तारखेपासून दिल्लीत हिंसाचार सुरू झाला आहे. साध्या बाचाबाचीचे रुपांतर हिंसक आंदोलनात झाले असून अनेक आंदोलकांनी परिसरातील घरे, दुकाने, गाड्या, सार्वजनिक मालमत्तेला आगी लावल्या, तसेच तोडफोडही केली. अनियंत्रित नागरिकांचे टोळके काठ्या आणि दांडके घेवून रस्त्यावरून फिरत आहेत. अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटनाही घडल्या. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
आंदोलकांना नियंत्रणात आणताना एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला आहे. तर दीडशेपेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. अनेक नागरिक भीतीने घरांमध्ये कड्या लावून बसले आहेत. ईशान्य दिल्लीतील अनेक भागात धुराचे लोट उठले होते. पोलिसांनी काही भागात एक महिन्यापर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तसेच 'शूट अॅट साईट'चे आदेशही देण्यात आले आहेत.