नवी दिल्ली - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी कॅन्सरने निधन झाले. मात्र दिल्लीमध्ये राहत असलेल्या त्यांच्या मुलीला लॉकडाऊनमुळे मुंबईत येण्यासाठी पोलिसांच्या परवानगीची गरज होती. दिल्ली पोलिसांनी त्यांना मुंबईला जाण्याची परवानगी दिल्यामुळे आता त्यांना वडिलांना अखेरचा निरोप देता येणार आहे.
रिधिमा साहनी असे त्यांच्या मुलीचे नाव आहे. त्यांच्यासह एकूण पाच जणांना मुंबईला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यांमध्ये भारत साहनी, समारा साहनी, अक्षय साहनी आणि दृगलक्ष्मी राय यांचाही समावेश आहे. आग्नेय दिल्लीचे पोलीस उपायुक्त आर. पी. मीना यांनी याबाबत माहिती दिली. रिधिमा या विशेष विमानाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुंबईत पोहोचतील. मुंबईच्या गिरगावमधील चंदनवाडी अंत्यभूमीवर ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
दरम्यान, बॉलिवूडसाठी गेले दोन दिवस अत्यंत धक्कादायक ठरले आहेत. काल अभिनेता इरफान खान याचे कॅन्सरने निधन झाले होते, त्यानंतर आज ऋषी कपूर यांनाही कॅन्सरमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. बॉलिवूडमधील प्रतिष्ठित अशा कपूर घराण्यातील तिसऱ्या पिढीचे अभिनेते असलेल्या ऋषी कपूर यांना बुधवारी रात्री उशीरा मुंबईच्या एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली.
हेही वाचा : रजनीकांत आणि कमल हसन यांनी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत व्यक्त केले दु:ख