नवी दिल्ली - तबलिग जमातचे प्रमुख मौलाना साद फरार नसून त्यांच्याविषयी अफवा पसरवण्यात येत आहेत. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती मौलाना साद यांचे प्रवक्ता आणि वकिल शाहिद अली यांनी दिली आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल जाणूनबुजून आपली चूक दुसऱ्यावर थोपत असल्याचा आरोपही केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात, सरकारी आदेशाचे उल्लंघन करत तबलिग जमातने दिल्लीच्या निजामुद्दीन मर्कजमध्ये धार्मिक कार्यक्रम घेतला. तेव्हा तबलिग जमातचे प्रमुख मौलाना साद आणि आयोजकांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. यानंतर मौलाना साद फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. मौलाना साद यांचे प्रवक्ता आणि वकिल असलेले शाहिद अली यांनी या अफवा असल्याचे सांगितले.
शाहिद अली यांनी याविषयी सांगितले की, 'मर्कज प्रकरणात पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणेकडून कोणतीही नोटिस मिळालेली नाही. इतकेच नव्हे तर कोणालाही चौकशीसाठी बोलवण्यात आलेले नाही. जेव्हा मौलाना साद यांना चौकशीसाठी बोलवण्यात येईल, त्यावेळी ते स्वत: हजर होतील आणि चौकशीला सामोरे जातील. मौलाना साद कोठेही गेलेले नाहीत. ते दिल्लीमध्येच आहेत.'
अली यांनी यावेळी, मर्कजमधील लोकांना बाहेर काढण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा दाखवला, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. याशिवाय त्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या काळात जिथे आहात तिथेच थांबा असे आवाहन केले होते. या आवाहनाचे पालन मौलाना साद यांच्याकडून करण्यात आल्याचेही अली यांनी सांगितलं.
मर्कजमध्ये लोकांना बोलवले जात नाही. येथे वर्षभर लोकं येत-जात असतात. लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर मर्कस व्यवस्थापनाने लोकांना बाहेर काढण्यासाठी पासची मागणी केली पण, मुख्यमंत्री केजरीवाल आणि केंद्र सरकारने पास दिले नाहीत. केजरीवाल जाणूनबुजून आपली चूक दुसऱ्यावर थोपत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन मर्कजमध्ये तबलिगीचा धार्मिक कार्यक्रम १ ते १५ मार्चच्या दरम्यान झाला. या कार्यक्रमासाठी देशातील २२ राज्यांमधून आणि जगातील ८ देशातील लोक जमले होते. यातील ३८० लोकं आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले यामुळे देशात हडकंप माजला.
आग्र्यात कोरोनाबाधितांची संख्या 20 वर, आकडा वाढण्याची भीती
विशेष : राजस्थान सरकारकडून सॅनिटायझरची निर्मिती; आतापर्यंत 16 लाख बाटल्या राज्यभरात पुरवल्या