नवी दिल्ली - दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी जगातील सर्वात मोठ्या कोविड सेंटरचे उद्घाटन केले. या कोरोना सेंटरचे नाव सरदार पटेल कोविड -19 केअर सेंटर असून दिल्लीतील राधा सोमाई सत्संग बियास, छत्तरपूर येथे सुरु करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये 10 हजार खाटांची क्षमता असून निमलष्करी दलाच्या 1 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना सेवा देण्यात येत आहे.
ज्या कोरोना बाधितांमध्ये कमी लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, घरामध्ये वेगळे राहण्याची सोय नाही. त्यांना या सेंटरमध्ये भरती करण्यात येत आहे. 27 जूनला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नव्यानेच तयार करण्यात आलेल्या या केंद्राला भेट दिली होती. सुरुवातील फक्त 2 हजार खाटांची क्षमता या कोरोना केंद्रात करण्यात आली होती. मात्र, आता 10 हजार खाटांची क्षमता करण्यात आली आहे.
गृह मंत्रालायाच्या देखरेखीखाली या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना रुग्णालयांची क्षमता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे हे कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले. या केंद्रात आयटीबीपी आणि निमलष्करी दलाचे 1 हजार डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी सेवा देत आहेत. तर आणखी 1 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठे कोरोना सेंटर असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.