नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात (जेएनयू) ५ जानेवारीला हाणामारी झाली होती. विद्यापीठातील प्राध्यापकांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सीसीटीव्ही फुटेज, व्हॉट्सअॅप चॅटिंग आणि इतर साहित्य सांभाळून ठेवण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने 'अॅप्पल', 'व्हॉट्सअॅप' आणि 'गुगल'ला नोटीस जारी केली आहे.
जेएनयूमध्ये ५ जानेवारीला झालेल्या हिंसाचाराबाबत न्यायालयाने उपरोक्त नमूद कंपन्यांना नोटीस जारी करत सर्व पुरावे जतन करण्याची मागणी केली आहे. 'आम्ही यापूर्वीच जेएनयू प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. मात्र, आतापर्यंत विद्यापीठाकडून प्रतिसाद मिळाला नाही. तसेच व्हॉट्सअॅपकडे २ समुहातील संभाषणाचे तपशील मागितले आहेत', असे न्यायालयात बाजू मांडताना दिल्ली पोलिसांनी सांगितले.